सुप्रसिद्ध अभिनेत्री चारुशीला साबळे यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान मोठं आहे. शाहीर साबळे यांची मुलगी म्हणूनही चारुशीला यांना ओळखलं जातं. शाहीर साबळे यांच्याबरोबर लोकधारा कार्यक्रम उभा करण्यात चारुशीला यांचाही मोठा वाटा आहे. साबळे कुटुंबातील मंडळी आजही कलाक्षेत्रात चांगलाच पाय रोवून उभे आहेत. चारुशीला या त्यापैकीच एक. शिवाय नात्याने त्या दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या मावशी आहेत. केदार यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र केदार यांनी कधीच काम दिलं नसल्याचं चारुशीला यांचं म्हणणं आहे. याचबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं. (Charusheela sable on kedar shinde)
ITSMAJJAच्या ठाकुर विचारणार या कार्यक्रमात चारुशीला साबळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी “दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा योग तुला कधीच आला नाही असं का?” असा प्रश्न चारुशीला यांना विचारण्यात आला. तेव्हा चारुशीला म्हणाल्या, “हा प्रश्न मला कित्येक लोक विचारतात. मी नेहमीच यावर उत्तर देणं टाळते. आमच्या घरात एवढा चांगला मुलगा असणं अभिमानाचीच गोष्ट आहे. खरंतर तो माझा विद्यार्थी आहे. केदार जन्माला आला तेव्हा मी १५ वर्षांची होते. महाराष्ट्राची लोकधारा मी केलं तेव्हा मी २५ वर्षांची होते. मी लोकधारा करायला जेव्हा घेतलं तेव्हा केदार १० वर्षांचा होता. लोकधारा करण्यासाठी मी एक एक मुलगा जेव्हा जमवत होते हे सगळं त्याने बघितलं आहे”.
“माझ्या सख्ख्या बहिणीचा तो मुलगा आहे. शाहीर साबळेंचा घरातील पहिला नातू. तो खूप लाडका होता. केदारचं बालपण खूप लाडात गेलं आहे. केदार शिंदे चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आला. तो इतक्या उच्च पातळीचा दिग्दर्शक झाला याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मोहन गोखले आमचा खूप जवळचा मित्र होता. तो त्या काळी गेला. आम्ही तर नेहमी भेटायचो. केदारने बऱ्याच कलाकारांचा उद्धार केला आहे. बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलं आहे. शुभांगी गोखलेला त्याने खूप सुंदर सीरिज दिली. त्यानंतर तिचं करिअर खूप पुढे गेलं. छान अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली”.
पाहा बेधडक मुलाखत
“एक ते दोन वर्षांनी अजित (पती) गेला. मला वाटलं तो माझाही उद्धार करेल. पण तसं काही घडलं नाही. त्यानंतर एका वर्षाने लक्ष्या (लक्ष्मीकांत बेर्डे) गेला. तोही आमचा खास मित्र होता. त्याने तिथेही ‘जत्रा’ चित्रपटात त्याच्या बायकोला काम दिलं. तिचाही उद्धार केला. सिद्धार्थ जाधव, भरत जाधव किंवा अंकुश जाधव अशा बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलं. हे सगळे कलाकार चांगलं नाव कमावण्यामागे केदारचा मोठा वाटा आहे. आणि ही मुलं इंडस्ट्रीत मोठं होण्यामागे माझा मोठा वाटा आहे. लोकधारामुळे हे घडलं. सुरुवातीचं शिक्षण जे असतं हे त्यांनी माझ्याकडूनच घेतलं आहे. त्याने महिलांशी संदर्भात अनेक चित्रपट केले. तो माझ्याबाबत विचार करु शकला असता”.
“मी त्याला कधी काय विचारलं नाही, त्यानेही मला कधी काय सांगितलं नाही. एकदा योग जुळून आला होता. मात्र ते कामंही त्याने मला दिलं नाही. दुसऱ्या अभिनेत्रीला त्याने ते दिलं. मला वचन देऊनही त्याने ते काम मला दिलं नव्हतं. असं माझ्याच घरातल्या माणसाने केलं आहे. परत काहीतरी नवं करायला मिळणार हा आनंद होता. मात्र तसं झालं नाही. त्याच भरात मी महेश कोठारेला फोन केला. त्याच्याकडील मालिकेमध्ये काम मिळवलं. ती मालिका जवळपास वर्षभर मी केली. भूमिका मला आवडली की नाही हे वेगळं. पण मी अजूनही काम करते हे मला दाखवून द्यायचं होतं. मी मुद्दाम ते काम केलं”. चारुशीला यांनी बेधडकपणे आपलं मत मांडलं.