Sharad Ponkshe Video : अभिनेते शरद पोंक्षे अभिनीत ‘पुरुष’ हे नाटक सध्या चर्चेत आले आहे. पुरुष या नाटकाचे दौरे सध्या महाराष्ट्रात सुरु आहेत. शरद पोंक्षे, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेते अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे ही कलाकार मंडळी या नाटकांत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. नुकताच या नाटकाचा प्रयोग बीड येथे झाला. यादरम्यान ज्या ठिकाणी हे नाटक झालं तिथे नाट्यगृहाच्या अस्वच्छतेसंदर्भातच्या मोठ्या प्रश्नाला घेऊन शरद यांनी पोस्ट शेअर केली. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा प्रयोग झाला. तेव्हा या नाट्यगृहाचा अतिशय भयंकर अनुभव कलाकारांना आला. अस्वच्छता, बाथरूमची भयाण अवस्था याबद्दल कलाकारांनी खंत व्यक्त केली व निषेध नोंदवला. समोर बीड नाट्यपरिषद पदाधिकारी व उपायुक्त उपस्थित होते, असं कॅप्शन देत शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
शरद पोंक्षे यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “अतिशय अप्रतिम रसिक-प्रेक्षक आहेत आणि या रसिक-प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब, इतका प्रवास करुन येत असतो. गंभीर विषयावरचं एक नाटक, इतका चांगला प्रतिसाद, इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही ते रिसिव्ह करताय, त्यासाठी खरोखरच तुमचं कौतुक. पण रसिकहो, पुन्हा पुन्हा इथं येणं आम्हाला शक्य होणार नाही, कारण या नाट्यगृहाची दुरवस्था. इतकी भयानक दुरवस्था आहे की एसी थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून २१ हजार रुपये भाडं घेतलं गेलं, पण नाट्यगृहात एअर कंडिशनर नाही. मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं नाही”.
आणखी वाचा – गोव्यात बंगला बांधल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, पहिला फोटो समोर
पुढे ते म्हणाले, “प्रसाधनगृहे नाहीत. बाथरूमची अवस्था इतकी भीषण आहे की महिला कलाकारांना जाणंच शक्य नाही. मेकअप रूम नाही, स्वच्छता नाही. या नाट्यगृहाला वालीच नाही. आज शासनाचे खूप मोठे अधिकारी इथे बसलेत, त्यांनी दखल घ्यावी, ही माझी नम्र विनंती आहे. ज्या कुणाच्या अंतर्गत हे नाट्यगृह येत असेल, त्यांना बोलवून सांगा की जर अशीच नाट्यगृहाची अवस्था ठेवली, दर्जेदार नाटकं आणि कलाकारांपासून बीडचे रसिक-प्रेक्षक मुकेल”.
आणखी वाचा – ‘छावा’साठी विकी कौशलला तगडं मानधन, पण इतर पाच कलाकारांना देण्यात आली फक्त इतकीच फी कारण…
पुढे ते असंही म्हणाले, “मला तर इथे परत यायची इच्छाच नाही. मी बीडला येईन, तुम्ही कार्यक्रमाला बोलावलंत तर तिकडे येईन, पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आमची इच्छा आज मेली. खूपच भयानक परिस्थिती आहे. नाट्यरसिकांची सुद्धा नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे, तुम्ही याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण बीडमध्ये चांगलं नाटक येणं बंद होईल. कारण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करु शकत. मी बोलतोय त्याचा फार काही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे, कारण मी या विषयावर १००० वेळा बोलून झालंय, पण राहवत नाही. फार वाईट अवस्था आहे”.