वैष्णवी हगवणे मृत्यप्रकरणी महाराष्ट्रभर विविध चर्चा सुरु आहेत. हगवणे कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. पती शशांक, सासरे राजेंद्र, दीर सुशील, सासू लता व नणंद करिश्मा यांनी मिळून वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ केला. फक्त हुंड्यापोटी या कुटुंबाने सूनेला जिवंतपणेच नरकयातना दिल्या. हगवणे कुटुंबियांनी त्यांच्या मोठ्या सूनेलाही वैष्णवीसारखीच वागणूक दिली. आता या प्रकरणामध्ये पुढील चौकशी सुरु आहे. अशातच वैष्णवीच्या मृत्यूनंतर कलाक्षेत्रातील मंडळींनीही त्यांचं मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. हुंडा देणं व घेणं दोन्ही गुन्हा अशाप्रकारच्या भूमिका मांडल्या. आता नाना पाटेकरांनीही या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. (Nana Patekar reaction on Vaishnavi Hagawane Death Case)
प्रविण तरडे, पुष्कर जोग, अश्विनी महांगडे, आस्ताद काळे यांसारख्या कलाकारांनी वैष्णवीला न्याय मिळावा म्हणून मागणी केली. तसेच हुंडा प्रथेला विरोध दर्शवला. आता नाना पाटेकरांनीही यावर आपलं मत मांडलं आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये नाना यांना विविध सामाजिक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना वैष्णवी मृत्यूप्रकरणी नाव न घेता पत्रकारांनी प्रश्न विचारले. समाजातील लग्नांचा अवाढव्य खर्च, हुंडा आणि त्यानंतर बळी अशाप्रकारचे प्रश्न विचारले.
यावर नाना वैष्णवीचं नाव न घेता म्हणाले, “दौलतजादा करणारी, तमाशाला जाणारी, दारु पिणारी अशीही कित्येक मंडळी समाजात असणारच. हा समाजाचा एक भाग आहे. झाडावर फळं येतात. त्याला फंगसही येते. म्हणून झाडं वाढवायची नाहीत का?, फळ घ्यायची नाहीत का?. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतच राहणार. लग्न कसं करावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. माझे संस्कार कसे आहेत? त्याच्यावर मी सगळं ठरवतो”.
पुढे ते म्हणाले, “मला असं वाटतं की, लग्नावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा मी ते वृद्धाश्रमाला देईन. अनाथाश्रमाला देईन किंवा कोणाच्या तरी मुलाच्या शिक्षणाला देईन. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. हातावर कुठलं घड्याळ बांधायचं?, कपडे कोणते घालायचे? हा मी अट्टाहास कोणाला करु शकत नाही. हुंडाबळी ही वृत्ती आहे आणि संस्कार आहेत. त्याच्यानुसार त्या माणसांना शिक्षा मिळेलच”. वैष्णवीला नक्की न्याय कधी मिळणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.