Ashish Vidyarthi road accident : टीव्ही आणि चित्रपट जगतातील अनुभवी अभिनेत्यांपैकी एक आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ यांचा रस्ता अपघात झाला. गुवाहाटी येथे शुक्रवारी रात्री दोघेही रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. यादरम्यान समोरुन येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आशिषने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन अपघाताबाबत सांगितले आणि तो आणि त्याची पत्नी दोघेही ठीक असल्याचेही सांगितले. आशिषने त्याच्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “मी एका विचित्र वेळी लाइव्ह करत आहे, फक्त तुम्हा सर्वांना कळवण्यासाठी”.
आशिष विद्यार्थीने त्याच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रुपाली आणि मी ठीक आहोत. आम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहोत पण सर्व काही ठीक आहे. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद”. ते म्हणाले, “सध्या मी अनेक वृत्तवाहिन्यांवर काय चालले आहे ते पाहत आहे. काल रुपाली आणि मी रस्ता ओलांडत होतो, तेव्हा एका दुचाकीने आम्हाला धडक दिली. आम्ही दोघेही ठीक आहोत. रुपाली डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. सर्व काही ठीक आहे, मी ठीक आहे. थोडी दुखापत झाली आहे, पण मी पूर्णपणे बरा आहे”.
आपल्या बरे होण्याबद्दल बोलताना आशिष पुढे म्हणाला, “आपण चालू शकतो, बोलू शकतो आणि उभे राहू शकतो, त्यामुळे हा फक्त एक संदेश आहे. Yes, there was an accident but we both are fine. याला मोठी बातमी बनवण्यासारखं काहीच नाही. मी पोलिसांशी बोललो आणि बाईक चालकही शुद्धीवर आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. रुग्णालयातील आपत्कालीन कर्मचारी आमची खूप चांगली काळजी घेत आहेत”.
आशिष आणि रुपालीचे लग्न २०२३ मध्ये झाले होते. याआधी आशिषचे पिलू विद्यार्थीसोबतचे लग्न २२ वर्षे टिकले होते, पण २०२२ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आशिषला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालेतर, आशिष विद्यार्थी शेवटचा करण जोहरच्या रिॲलिटी शो ‘द ट्रेटर्स’ सीझन १ मध्ये दिसला होता.





