देओल कुटुंबातील अभिनेता अभय देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. अभयने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत ‘देव डी’सारख्या अनेक चित्रपटांमधून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. १९ वर्षांपूर्वी दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित ‘सोचा ना था’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटाच्या वर्धापनदिनानिमित्त अभय देओलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत स्वत:ला पॉर्न स्टार म्हणवून घेत केलेलं आश्चर्यकारक विधान चर्चेत आलं आहे. (Abhay Deol Viral Post)
‘सोचा ना था’ या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभय देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून त्यात बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया देखील दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोचा ना था’ चित्रपटाबाबत खास संदेश लिहिला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने म्हटले आहे की, “१९ वर्षांपूर्वी या चित्रपटाद्वारे मी इंडस्ट्रीत पदार्पण केले. आताही कालच घडल्यासारखं वाटतंय. या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आणि आम्ही खूप निरागसही होतो. तथापि, मला खूप आनंद आहे की, मी पीआर पॉलिसीद्वारे वा ब्रँडच्या साहाय्याने स्वतःची स्थापना केली नाही. पण जवळपास दोन दशकांनंतरही मी चित्रपट करत आहे”.
पुढे त्याने लिहिले आहे की, “मी निवडलेल्या चित्रपटांच्या आधारे मी स्वतः एक ब्रँड बनलो आहे. या काळात मी यश व अपयश या दोन्हींचा सामना एकट्याने केला आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की, माझ्याकडे चित्रपटासाठी माझा स्वतःचा स्टायलिस्ट असेल आणि कोणीतरी मला सांगेल की, मी ७०च्या दशकातील पॉर्नस्टारसारखा दिसतो”.
अभय देओल यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने ‘ओये लकी’, ‘लकी ओये’, ‘देव डी’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘आयशा’, ‘रांझना’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. येत्या काळात तो ‘व्हॅन टिक्की’ या चित्रपटात दिसणार आहे.