sukhada khandkekar health updates : कलाकार मंडळी हे त्यांच्या कलेसाठी पूर्णतः वेडे असतात. घर, वेळ, काळ, ओढवलेली परिस्थिती याचा कसलाही विचार न करता ही मंडळी त्यांचा अभिनय सुरुच ठेवतात. बरेच असे कलाकार आहेत जे त्यांच्या आजारपणातही आपली योग्यतोपरी काळजी घेत शूटला जातात. काहींना शूटदरम्यान दुखापत झाल्यावरही लवकरात लवकर बरे होऊन ही मंडळी पुन्हा शूटसाठी रुजू होतात. अशातच अभिनेत्री सुखदा खांडकेकर गेले दोन महिने घरीच आहे. नाचताना गुडघा ट्विस्ट झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आता दोन महिन्यांनी ती पुन्हा रंगभूमीवर परतत आहे. याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सुखदाने पोस्ट शेअर करत म्हटलं की, “कहाणी में ट्विस्ट, शेवटचे दोन महिने. आराम कोणाला आवडत नाही?. पण नुसता आराम नको रे बाबा. नाचताना एकदा गुडघा ट्विस्ट झाल्याचं निमित्त झालं आणि २९ एप्रिलला थेट शस्त्रक्रिया करुन आराम करायला मी खऱ्या अर्थाने एका पायावर तयार झाले. खरंतर लिगामेंट टेअरच्या ऑपरेशननंतर किमान तीन महिने आराम, फिजिओथेरेपी आणि हळू हळू रिकवरी अपेक्षित असते. पण मी तर दोन महिन्यानंतरचा कार्यक्रम घेऊन ठेवला होता, तोही नाच आणि थेट युरोपियन मराठी संमेलन, लेस्टर मध्ये. मग मनाचा हिय्या करुन छान लवकर बरं व्हायचं असा चंगच बांधला. बसून वजन वाढू नये म्हणून योग्य डाइट, फिजिओथेरेपी, बरोबरच मनाचा निश्चय किती महत्त्वाचा असतो हे या निमित्ताने पुन्हा लक्षात आलं. One day at a time म्हणत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत मी जिद्दीने माझे प्रयत्न सुरु ठेवले. या संपूर्ण काळात माझी आई, माझा नवरा,देवेंद्र पेम दादा आणि दिनेश लाड सर, ज्यांनी डॉक्टर शोधण्यापासून, लवकरात लवकर अपॉइंटमेंट मिळवुन देण्यापर्यंत सगळं केलं”.
आणखी वाचा – तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू, कार सीन शूटदरम्यान भयंकर अपघात, जागीच निधन अन्…
पुढे तिने आभार व्यक्त करत म्हटलं, “माझे डॉक्टर चिंतन हेगडे, माझी फिजियोथेरेपिस्ट डॉ, साक्षी, ट्रेनर संजीत, माझे मित्र – मैत्रिणी आणि माझा नवीन मित्रच झालेला वॉकर याने खूप साथ दिली. इवेंट ऑर्गनायझर अमोलचे विशेष आभार, माझ्यावर विश्वास ठेवला, मला कोरियोग्राफीमध्ये पूर्ण लिबर्टी दिली. त्यांनी मला जमतील अशा स्टेप्स बसवून काम जरा सोपं केलं. Leicester च्या स्थानिक कलाकारांचे आभार, ज्यांनी मला मोलाची साथ दिली. आणि अखेर दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर प्रत्येक नर्तिकेला, अभिनेत्रीला ज्याची ओढ असते त्या रंगभूमीवर पुन्हा दमदार पाऊल टाकलं”.
आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, धोका टळला नाही, स्वतःच म्हणाली, “आता…”
शेवटी ती म्हणाली, “हे सगळं सविस्तर लिहायचं कारण माझं कौतुक नसून माझा प्रयत्न आहे. अशा सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा की तुम्ही मनात आणला तर तुम्हाला काहीही, कोणीही रोखू शकत नाही. मग शारिरीक आजार असो किंवा मानसिक, फक्त मनात ठरवता आलं पाहिजे मग. sky is the limit”. सुखदाची ही पोस्ट पाहून अनेक कलाकार मंडळी आणि चाहते मंडळी तिला काळजी घेण्यास आणि लवकरात लवकर बरे होण्यास सांगत आहेत.





