मराठी मनोरंजन विश्वात नाटक, मालिका व चित्रपट यांच्याबरोबरच वेबसीरिजचीही चांगलीच लोकप्रियता वाढली आहे. सध्या अनेक ओटीटी माध्यमांवर अनेक प्रकारचे चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत. याशिवाय युट्यूबवरीलही अनेक सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशातच युट्यूबवर एका वेबसीरिजने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोणताही ओळखीचा चेहरा न घेता केवळ कथानकाच्या आणि नवोदित कलाकारांच्या उत्तम अभिनयाने नटलेल्या या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे आणि ही लोकप्रिय वेबसीरिज म्हणजे ‘आठवी अ’.
‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ आणि ‘इट्स मज्जा’ ओरिजनल नेहमीच प्रेक्षकांसाठी आशयघन व मनोरंजक गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘आठवी-अ’ ही सीरिज. या सीरिजचे आतापर्यंत १९ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या प्रत्येक भागाने लाखों व्ह्यूज्स व लाईक्सचा टप्पा पर केला आहे. त्यामुळे ‘आठवी-अ’ला मिळत असलेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल कराड व सांगली येथे खास कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
आणखी वाचा – ‘धडक २’ चित्रपटाची मोठी घोषणा, मात्र जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत नाही, दोन नवीन कलाकार दिसणार
‘आठवी-अ आणि बरंच काही’ या कार्यक्रमाअंतर्गत कराड व सांगली येथे खास ‘आठवी-अ’ या सीरिजच्या कलाकारांशी खास संवाद साधण्यात आला. यावेळी काही डान्स व एकांकिकेचेही सादरीकरणदेखील करण्यात आले. २५ मे २०२४ रोजी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल)मध्ये हा कार्यक्रम पार पडला. तर २६ मे २०२४ रोजी सांगलीमधील विष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिरमध्ये हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी व चाहत्यांनी कलाकारांचे व ‘आठवी-अ’ या सीरिजचे भरभरून कौतुक केले.
आणखी वाचा –‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका हिंदीतही येणार, नावही समोर, कुठे पाहता येणार?
दरम्यान, ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. सीरिजचे सह-दिग्दर्शक नितीन वाडेवाले हे आहेत. तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण हे या सीरिजचे प्रोजेक्ट प्रमुख आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे असून फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी स्वीकारला आहे.