काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला. अश्विनीच्या जवळच्या व्यक्तीचं म्हणजेच तिचं भरभरून लाड करणाऱ्या आजीचं निधन झाल्याने अभिनेत्री भावुक झाली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून आजीबरोबरचा फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली होती. या दुःखातून सावरत अश्विनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. अश्विनी सध्या आई कुठे काय करते मालिकेत अनघा ही भूमिका साकारताना दिसत आहे. (Ashvini Mahangade Emotional)
नुकताच अश्विनीने भावुक होत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आई कुठे काय करते मालिकेतील तिची रील लाईफ आजी तिला मिठी मारताना दिसतेय. यावेळी अश्विनी रडताना दिसतेय. भावुक होत शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन देत अश्विनीने लिहिलं आहे की, “आजी. ऑनस्क्रीन मला संसाराचे धडे देते, थोडी माझ्या निर्णयावर नाराज होते, चिडते, रुसून बसते. पण ऑफस्क्रिन माझी प्रचंड काळजी घेते, माझ्या सुखं दुःखात साथ देते, चार चांगल्या गोष्टी सांगते, रोज माझ्यासाठी घरून जेवण आणते आणि सगळ्यात महत्वाचे माझ्यावर खूप खूप प्रेम करते. माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप प्रेम.”
याआधी अश्विनीने तिच्या रिअल लाईफ आजीचं निधन होताच भावुक पोस्ट शेअर केली होती. यांत तिने म्हटलं होतं, “आजी, फक्त प्रेमाचा साठा पण भारी शिस्तीची. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. एक काळ असा होता जेव्हा प्रचंड हाल सोसले पण कल्पतरू सारखी खंबीर उभी राहिली. माझे आणि बाबांचे (पाहुणे म्हणायची ती बाबांना कारण जावयाचे नाव घ्यायचे नसते) किती कौतुक. आम्हा सगळ्यांची चिंता तिला नेहमी असायची. मशाल दौडला आला तर १० वेळा मला फोन केला आणि त्याची काळजी घ्यायला सांगितली.”
अश्विनी आजीच्या आठवणीत भावुक होतं तिच्या रील लाईफमधील आजीला मिठी मारत भावुक झाली. हे भावुक फोटो पाहून अनेकांनी कमेंट करत तिला आधार दिला आहे. तर कलाकार मंडळींसह अनेकांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.