छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री सीमा घोगळे हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. सीमा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते, नेहमीच ती सोशल मीडियावरून तिला आलेले अनुभव चाहत्यांसह शेअर करत असते. यापूर्वी सीमा ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विमलच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचली. तसेच ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. वेगवेगळे रील्स करून ती सोशल मीडियावरून पोस्ट करत असते. अशातच सीमाने तिच्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्तीबाबत केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. (Seema Ghogale Shared Emotional Post)
अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडिलांचा फोटो शेअर केला असून, त्याखाली कॅप्शन देत म्हटलं आहे की, “बाबा.आज ५ वर्ष झाली, तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही जड जातंय,पण मी ठिक आहे काळजी करू नका. शेवटच्या श्वासापर्यंत स्पर्धेचं सगळं नियोजन नीट झालंय ना याची काळजी होती तुम्हाला, तुमचा हा वारसा पुढे नेण्यास थोडी कमी पडतेय मी, पण मी ठिक आहे काळजी करू नका. माझ्या वाढदिवसाला, सणासुदीला १५ दिवस अगोदर खरेदीला पैसे द्यायचात तुम्ही,आता माझी मीच खरेदी करते पण मी ठिक आहे, काळजी करू नका.”
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर थलापती विजयच्या ‘लिओ’चा बोलबाला, पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमावले इतके कोटी
“माझ्या नाटकाचा प्रयोग कसा झाला, आज शूटिंगला किती सीन झाले किंवा तुमच्या स्वभावानुसार क्वचित कधीतरी छान झालं काम असं म्हणायचात, आता तुमची ती दाद मिळत नाही, पण मी ठिक आहे काळजी करू नका. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी घरी परत आल्यावर तुम्ही असायचात दार उघडायला आता कुलूप उघडून माझी मीच येते कारण दार उघडायला तुम्ही नाहीत, पण मी ठिक आहे काळजी करू नका.”
“एका मुलीसाठी सगळ्यात सुरक्षित जागा कुठली असेल तर तिच्या बाबांचं छत्र तिच्या डोक्यावर असणं तुम्ही गेलात, पण मी ठिक आहे काळजी करू नका. सीमा अनंत घोगळे म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या चुकत माकत का होईना पार पाडल्या, यापुढेही पाडेन तुम्ही फक्त सोबत रहा. आणि मी ठिक आहे खरंच काळजी करू नका. तुमची खूप आठवण येते.”
सीमाने आजवर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असलं तरी तिने तिच्या अभिनयाची खरी सुरुवात ही रंगमंचापासून केली. गेल्या १९ वर्षांच्या काळात अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘सुरक्षित अंतर ठेवा’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘२६ ५२ उन्हापावसाची बेरीज वजाबाकी’, ‘शिकस्त’, ‘टू बी कन्टिन्यूड’ ही तिची गाजलेली नाटकं आहेत.