Rutuja Bagwe On Thane Gaymukh Ghat Accident: मुंबई आणि उपनगरातल्या न संपणाऱ्या समस्या याबद्दल नागरिक वेळोवेळी आवाज उठवत असतात, पण गेल्या काही वर्षात मराठी कलाकारही या सगळ्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरचा प्रवास आणि वाहतूककोंडी हा नवीन विषय नाही. अनेक कलाकार आतापर्यंत या मुद्द्यावर बऱ्याचदा व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान नुकताच ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख घाटात एक विचित्र अपघात घडला. या मार्गावर तब्बल १४ वाहनांची एकमेकांशी धडक झाली. यामुळे भीषण अपघात झाला. याच अपघाताबद्दल मराठी अभिनेत्रीनं पोस्ट शेअर केली आहे.
ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती अतिशय वाईट असल्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर कलाकार देखील त्रस्त आहेत. याबाबत अनेक मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला. अशातच आज झालेल्या अपघाताबद्दलची पोस्ट अभिनेत्री ऋतुजा बागवेने शेअर केली. ऋतुजा बागवे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अशातच तिने ठाणे-घोडबंदर येथील गायमुख घाटात झालेल्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. ऋतुजाने शेअर केलेल्या या व्हिडीओमधून अपघाताची भीषणता लक्षात येत आहे. घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहने वाहतुक करत होते. त्याचवेळी काही हलकी वाहने या मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतुक करत होते. नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांना धडकली असल्याची माहिती समोर आली आहे. (Rutuja Bagwe On Thane Gaymukh Ghat Accident)

ऋतुजाने अपघाताचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हटलं की, “विरुद्ध दिशेला गाडी टाकल्यामुळे अपघात झाला, असं म्हणून सरकारने कृपया हात झटकू नये.” तसंच यापुढे तिनं अपघाताचं खरं कारण ‘रस्त्याची दुरवस्था’, ‘कायम ट्रॅफिक’ आणि ‘ट्रॅफिक पोलिस नसणे’, तसंच ‘सरकारचं दुर्लक्ष’ असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, या अपघातात अनेकजण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती पोलीस, वाहतुक शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चार जखमींना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. (Rutuja Bagwe On Thane Gaymukh Ghat Accident)



