‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोर दगडू-प्राजूच्या या लव्हस्टोरीने सर्वांना वेड लावलं होतं. दगडू-प्राजूकी हटके लव्हस्टोरी आजही अनेक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटातील त्यांच्या लव्हस्टोरीसह गाणी, संवाद सगळंच काही प्रेक्षकांना भावलं होतं. या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण होऊनही आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटातीळ प्रत्येक संवाद आणि गाणी चाहत्यांच्या लक्षात आहेत. या चित्रपटामुळे नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. या चित्रपटामुळे तो सर्वत्र दगडू म्हणून ओळखू जाऊ लागला आणि आजही त्याची तीच ओळख आहे. या चित्रपटाने त्याचं आयुष्य संपूर्ण बदललं. (Prathamesh Parab on Timepass movie)
३ जानेवारी २०१४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आज या चित्रपटाला एकूण ११ वर्षे झाली आहेत आणि यानिमित्याने मुख्य अभिनेता प्रथमेशने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या ११ व्या वर्षाच्या पूर्ततेनिमित्त त्याने ही खास पोस्ट शेअर केली आहे. ‘टाइमपास’ चित्रपटातीलच दगडूचा फोटो शेअर करत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “”ए, तो बघ दगडू!”, “दगडू, एक सेल्फी काढू का?”, “दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय?”. आज ११ वर्षानंतरही, दगडू लोकांच्या लक्षात आहे, या प्रेमाबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. माझं आयुष्य ३६०° ने बदलणारी एक संधी, एक व्यक्तिरेखा आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचा झालेला अविभाज्य भाग”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, शाही पध्दतीने पार पडला लग्नसोहळा, फोटो व्हायरल
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “एखादा चित्रपट हिट झाला तरीही हा दगडू मला आठवतो किंवा एखादा चित्रपट फारसा चालला नाही तरीही! चित्रपट हिट झाल्यावर, ‘टाइमपास’च्या वेळचे हाऊसफुलचे बोर्ड्स आठवतात, “आई बाबा आणि साईबाबा शप्पथ” असच काम करत रहा, असं म्हणत दगडू माझं कौतुक करत असेल हे जाणवतं. त्याउलट जर एखादा चित्रपट फारसा चालला नाही तर, तू टेन्शन नको घेऊस रे, टेन्शनला, “चल ए, हवा आने दे” म्हण आणि पुढे जा, असही म्हणणारा दगडू मला जाणवतो”.
यापुढे प्रथमेशने दिग्दर्शक रवी जाधव, लेखक प्रियदर्शन जाधव व संगीतकार चिनार-महेश यांचे आभार मानले आहेत. तर प्रथमेशने शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “हा चित्रपट खूप कमाल होता”, “आजही हा चित्रपट आमच्या लक्षात आहे”, “दगडू आणि प्राजू एक अविस्मरणीय प्रेमकथा”, “मराठीतला सर्वात भारी चित्रपट” या आणि अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी प्रथमेशच्या या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी प्रथमेशच्या अभिनयाचेही कौतुक केलं आहे.