सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. आईच्या निधनानंतर मृणाल यांनी “तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रुपाने तिची सोबत कायम असेल”. अशी भावुक पोस्ट शेअर केली होती. (Mrinal Kulkarni emotional of her mother)
अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा आईच्या आठवणीत भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी आईच्या निधनावर भाष्य केलं. यावेळी त्या असं म्हणाल्या की, “अशा माणसांचा सहवास लाभावा असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. त्यामुळे आम्हालाही तो सहवास लाभावा वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. पण हेही समजून घेतलं पाहिजे की, अशा घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात आणि तो विशिष्ट माणूस त्या त्रासातून जात असतो. ते भोग भोगत असतो. तेव्हा कधी तरी असं वाटतं की, यातून त्याची सुटका झाली तर बरं… आईलाही खूप त्रास होत होता आणि तो त्रास इतका होता की, ती रोज म्हणत होती की, आता हे बस्स झालं… हे सगळं संपवा”.
आणखी वाचा – “माझा नातू माझं स्किट करेल”, अरुण कदम यांचे नातवाविषयी भाष्य, म्हणाले, “मला स्क्रीनवर बघून…”
यापुढे मृणाल असं म्हणाल्या की, “हे रोज बघणं माझ्यासाठीही अतिशय कठीण होतं. पण मला नेहमीच असं वाटतं की ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण असे आहोत. आपल्यावर जे काही संस्कार झाले आहेत, ते त्या माणसामुळे झाले आहेत आणि अशा माणसाला जेव्हा आपली गरज सते. तेव्हा आपण त्यांना २४ तास दिले पाहिजेत आणि मी माझ्यापरीने तिला संपूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न केला. मध्ये मी माझ्या एका लेखात लिहिलं होतं की मला तिची आई व्हायचं आहे, कारण आईची आई होणे ही खूप कठीण गोष्ट आहे आणि मी मनापासून प्रयत्न केला”.
आईच्या निधनानंतर आपल्या कामात पुन्हा सक्रीय होण्याबद्दल त्या म्हणाल्या की, “या घटनेतून बाहेर येणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं आणि आताही नाही. पण माझ्या करिअरने पुन्हा मला एकदा हात दिला. आई गेल्याच्या दहा-बारा दिवसांत माझ्या तीन चित्रपटांचे प्रमोशन सुरू झाले. मी त्यांना सांगितलं होतं की मला ते जमणार नाही. पण मला माझ्या आईनेच कुठेतरी तो रस्ता मोकळा करून दिला”.