टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर ठरलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून टेलिकास्ट होणाऱ्या ह्या मालिकेचा स्टार प्रवाहवर ३० नोव्हेंबरला शेवटचा भाग प्रसारित झाला. मालिका संपणार, अशी घोषणा केल्यापासून अनेक कलाकार सोशल मीडियावर सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अशातच स्टार प्रवाहच्याच होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’च्या टीमने खास हजेरी लावली. (Milind Gawli Emotional)
‘आई कुठे काय करते’ ही मालिकेच्या निरोपानिमित्त कलाकार शेवटच्या भागांचे शूटिंग संपवून ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ शोमध्ये पोहोचले. यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील काही कलाकारांनीही हजेरी लावली. दोन्ही मालिकांतील कलाकारांनी या मंचावर नुसता धिंगाणा घातला. एकूणच येथे सर्व कलाकारांनी भरपूर आनंद आणि मजा-मस्ती केल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी आपल्या आईच्या आठवणीत काहीशे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, यात ते आपल्या आईच्या आठवणीत भावुक झाले असून यावेळी ते असं म्हणाले की, “तू (सिद्धार्थ जाधव) एक कलाकार आहेस मी ही एक कलाकार आहे. बरीच वर्ष आपण काम करत आहोत, शुटींग संपलं की आपण घरी जातो. मागे वळून बघत नाही. पण स्टार प्रवाह एक परिवार आहे. मी त्याला परिवारच मानतो कारण ही पाच वर्षे काढणे सोपे नव्हते, स्टार प्रवाहने अनेक कार्यक्रम केले. ‘होऊदे धिंगाणा’मध्येही मी चार ते पाच वेळा आलो आहे त्यात त्यांनी मला कायम पुढे जा पुढे जा आम्ही आहोत असं म्हणत एका कुटुंबातील सदस्यासारखे वागवलं”.
यापुढे ते भावुक होत असं म्हणाले की, “आता पाच वर्षांनी जे काय प्रेम मिळत आहे आणि हा एक खास क्षणच आहे. माझ्या ३५-४० वर्षांच्या करिअरमधला सगळ्यात सुंदर क्षण… पण हा इतका सुंदर क्षण बघायला आज माझी आई नाही. त्यामुळे मला खूप रडू आलं. खूप वर्षे या क्षणासाठी प्रामाणिकपणे काम करत होतो. पण ती बघत असणार ना रे??”. यावर मंचावरील एक जण त्यांचे सांत्वन करत “हो…सर नक्की तुमची आई हे बघत असणार” म्हणते.