बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने त्याच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अलीकडेच विक्रांत ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात दिसला होता. याआधी ‘१२ वी फेल’ आणि ‘सेक्टर ३६’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक झाले होते. या यशाचा फायदा घेऊन विक्रांत पुढे जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र या अभिनेत्याने अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी तो अभिनयाला अलविदा करणार असल्याचं समोर आलं आहे. (vikrant massey retirement)
विक्रांतने सोमवारी (२ डिसेंबर) सकाळी २०२५ नंतर अभिनयातून निवृत्त होणार असल्याची घोषणा करुन त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नोटमध्ये त्याने लिहिले की, “गेली काही वर्षे आणि त्याआधीचा काळ आश्चर्यकारक होता. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, परंतु जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवले की एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणूनही आता स्वतःला साजेशी आणि घरी परतण्याची वेळ आली आहे”.
रिपोर्ट्सनुसार, विक्रांत सध्या ‘यार जिगरी’ आणि ‘आँखों की गुस्ताखियां’ या दोन चित्रपटांवर काम करत आहे. या चित्रपटांबद्दल बोलताना अभिनेत्याने लिहिले, “मी २०२५ मध्ये शेवटची भेट घेणार आहे. मागील दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणींसाठी पुन्हा एकदा धन्यवाद”. विक्रांतच्या या घोषणेने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी टिप्पण्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले. एका चाहत्याने लिहिले, “तू असे का करत आहेस? तुझ्यासारखे फार कमी कलाकार आहेत. आम्हाला चांगल्या सिनेमाची गरज आहे”. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “अचानक? सर्व काही ठीक आहे का?”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, घरात आढळला मृतदेह
विक्रांतच्या चाहत्यांसाठी ही खूप धक्कादायक बातमी आहे. अनेक चाहत्यांनी विक्रांतला या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंतीही केली. “भाऊ, तू शिखरावर आहेस. तू असा विचार का करतोस?”, असे त्याच्या एका चाहत्याने विचारले आहे. काही चाहत्यांना असा प्रश्न पडू लागला की हा कुठल्या चित्रपटाचा किंवा ब्रँडच्या प्रचाराचा हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना?.
आणखी वाचा – 02 December Horoscope : मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस खास, जाणून घ्या…
दरम्यान, विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २८ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.