आई… हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील हळवा कोपरा आहे. जगातील सर्वात निस्वार्थी व्यक्ती म्हणजे आई. कधी मैत्रीण म्हणून ती साथ देते तर कधी चुकल्यावर कानही पकडते, पण पुन्हा मायेने जवळ घेणार एक व्यक्ती म्हणजे आई. नवरा, मुलं, सासू-सासरे, नणंद, भावजय, कुटुंबिय, नातेवाईक अशा सर्वांशी मनं जपणाऱ्या आईच्या आयुष्यावर आधारित छोट्या पडद्यावर काही वर्षांपूर्वी एक मालिका आली होती. ती म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. गेली पाच वर्षे सतत काम केल्याने या मालिकेतील कलाकारदेखील या सगळ्यांबरोबर जोडले गेले होते. आता विविध मुलाखती, सोशल मीडियावर शेअर केलेले पोस्ट यांमधून कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Siddharth Jadhav Mother)
अशातच अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही या मालिकेच्या निरोपानिमित्त आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्याने असं म्हटलं की, “नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. ‘आई कुठे काय करते’ मालिका येत्या ३० नोव्हेंबरला मायबाप रसिक प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मी आईविषयी खूप बोलतो आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे मला मी निर्व्यसनी असल्याचा अभिमान आहे. मी दारु, सिगारेट असं काही व्यसन करत नाही. याचं मुख्य कारण माझी आई आहे. लहान असताना मी एक नाटक केलं होतं तेव्हा मी त्यात दारू पिण्याचे नाटक केलं होतं”.
यापुढे अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “तेव्हा रात्री मी घरी गेलो तेव्हा आई खूप घाबरली होती. तेव्हा तिला माझं पोरगं दारु पिऊन आलं की काय असं वाटलं आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की तुला कधी काही व्यसन करायचं असेल तर माझा चेहरा डोळ्यांसमोर आण. आणि ही गोष्ट मी नेहमीच पाळत आलो आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात निस्वार्थ नातं हे आई-वडिलांचे आहे. आपल्याकडून त्यांची कधीच काहीच अपेक्षा नसते. पण आपण ज्यांना नेहमीच गृहीत धरतो ते नातं पण आई-वडिलांचेच आहे”.
आणखी वाचा – “मालिका करायचीच नव्हती पण…”, नवी मालिका सुरु होताच अशोक सराफ यांचं वक्तव्य, म्हणाले, “ते धोबीकाम होत जातं…”
यापुढे सिद्धार्थने प्रेक्षकांना मालिकेचे शेवटचे भाग पाहण्याची विनंती करताना असं म्हटलं आहे की, “आईच्या अनेक भूमिका दाखवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे आता काही शेवटचे भाग मी पाहणार आहे आणि ते तुम्ही पण बघा”. दरम्यान, स्टार प्रवाह चॅनेलच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे सिद्धार्थच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने त्याच्या आयुष्यातील आईच्या स्थानाबद्दल व आईच्या शिकवणीबद्दल सांगितलं आहे.