शक्तिमान’ हा ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो होता. ‘शक्तिमान’च्या रुपाने भारतीयांना पहिला सुपरहिरो मिळाला. ९० च्या दशकातील लहानग्यांमध्ये या शोची प्रचंड क्रेझ होती. काही दिवसांपूर्वी अभिनेते मुकेश खन्ना यांनी या शोची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. १९ वर्षानंतर शक्तिमान शो परतणार अशी त्यांनी घोषणा केली होती. पण काही कारणामुळे चाहते मंडळी या शोवर आणि मुकेश खन्ना यांच्यावर नाराज आहेत. अशातच आता या नाराजीमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mukesh Khanna Angry)
मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हायरल व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना काही लोकांवर ओरडताना दिसत आहेत. मुकेश खन्ना पत्रकारांना उत्तरे देत असताना कुणी तरी बोलत असतं आणि त्यांच्यामुळे मुकेश खन्ना वैतागून त्यांच्यावर ओरडतात. यावेळी ते असं म्हणतात की, “आपण का बोलत आहात? तुम्ही लोक कितीही वरिष्ठ असाल पण मी इथे बोलत असताना तुम्ही का बोलत आहात? शांत बसा, तुम्ही मला इथे बोलायला बोलावलं आहे. मग तुम्ही ऐकत का नाही आहात? जे बोलायचे आहे ते बाहेर जाऊन बोला”.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. तसंच काहींनी मुकेश खन्ना यांच्या या वागणूकीबद्दलची तुलना जया बच्चन यांच्याबरोबर केली आहे. मुकेश खन्ना यांची तुलना जया बच्चनशी केली कारण जया बच्चन अशा विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. “जया बच्चन तुम्ही शक्तीमानच्या पोशाखात आहात का?” अशी मिश्किल टिपणी नेटकऱ्याने केली आहे. तर आणखी एकाने “शक्तीमान किलविशसारखा का वागत आहे?” असं म्हटलं आहे.
तसंच एकाने मुकेश खन्ना यांनी “म्हातारा माणूस” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने जया बच्चन व कंगणा रनौत यांचे मिळून मुकेश खन्ना होतात” असं म्हटलं आहे. एकूणच मुकेश खन्ना यांचा हा स्वभाव नेटकऱ्यांना आवडला नसून तशा अनेक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, शक्तिमानच्या नवीन सीझनचा पहिला भाग ११ नोव्हेंबर रोजी मुकेश खन्ना यांच्या भीष्मा इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.