‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी तिच्या या मालिकेतील सायली या पात्रामुळे नेहमीच चर्चेत आली आहे. सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी असून, या मालिकेविषयीच्या विविध अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करते. जुई अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच सामाजिक भानही जपते आणि याच सामाजिक भानामुळे जुई इतरांपेक्षा वेगळी ठरते. जुई गेली अनेक वर्षे आश्रमात जाऊन कुष्ठरोगाशी झुंज देणाऱ्या व अनाथ वृद्धांना मदत करते. गेली १९-२० वर्षे ती हा उपक्रम करत आहे. येत्या दिवाळीतदेखील ती हा उपक्रम करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार तिने या उपक्रमाला सुरुवात केली असून याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Jui Gadkari Orphanage Visit)
जुईने २७ ऑक्टोबर रविवार रोजी शांतिवनमधील अनाथाश्रमाला भेट देत दिवाळीच्या तिच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यावेळी तिने सर्वांशी प्रेमाने संवाद साधला. तसंच स्वत:च्या हाताने त्यांना काही भेटवस्तुही दिल्या. यावेळी अनाथाश्रमातील अनेक आजी-आजोबांनी जुईचे कौतुक केले. तसंच जुईनेदेखील सर्वांशी मनमुरादपणे गप्पा मारल्या त्याचबरोबर जुईने यावेळी सर्वांसाठी खास गाणेही गायले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे गाणं गात तिने उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी जुईसह तिचे अनेक सहकारीदेखील या व्हिडीओमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.
जुईने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शांतिवन आश्रमाची पूर्ण झलक पाहायला मिळत आहे. जुईच्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे या स्तुत्य उपक्रमानिमित्त कौतुक केले आहे. “चांगले काम करत आहेस ताई त्यामुळे तू मला खूप आवडते. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊदेत. श्री स्वामी समर्थ”, “मस्त ताई एक चांगली कलाकर झाली पण आपले पाय तू जमिनीवर ठेवले आहेस, खूपच छान”, “रीलमधल्या आश्रम संस्थेतील तुझा वावर जितका लोकप्रिय, तितकेच किंबहुना जास्त वंदनीय आणि आदरणीय रीअल लाईफ आश्रमातील हे असे कार्य”, “तुम्ही खूप ग्रेट काम करत आहात” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी जुईचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा – सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार मिळताच प्रसादसाठी अमृताची खास पोस्ट, म्हणाली, “‘पारु’ मालिकेमधला आदित्य बघताना…”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जुईने हा उपक्रम करणार असल्याचे सांगत याबद्दल माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी तिने “शांतिवन, नेरे या ठिकाणी जाण्याचे माझे हे साधारण १९-२० वे वर्ष आहे. तिथे जाऊन आम्ही कुष्ठरोगी आणि निराधार आजी-आजोबांबरोबर एक दिवस साजरा करतो. यात कुणाला मदत करायची असेल तर मला कळवा” असं म्हटलं होतं.