मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार म्हणून आपण ज्याला ओळखतो तो कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम परीक्षक व एक उत्तम माणूस म्हणून तो चांगलाच लोकप्रिय आहे. संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो त्याच्या कवितांसाठीही ओळखला जातो. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या कविता व अभिनयामधून चर्चेत राहणारा संकर्षण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. (Sankarshan Karhade On Instagram)
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचला. त्याने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्यांच्या यादीत संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरु आहेत. या नाटकांना सर्वत्र या नाटकाची विशेष जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत असून सध्या या नाटकाचे दौरे परदेशात सुरु असल्याचं दिसत आहे. या नाटकासाठी सध्या तो कतार येथे गेला असल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सध्या तो कतार मध्ये त्याच्या नाटकाच्या प्रयोगानिमित्त गेला आहे आणि तिथल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून त्याने भारावून जाऊन एक खास पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास क्षण शेअर केले आहेत आणि असं म्हटलं आहे की, “नमस्कार, अहो ‘परभणीच्या काद्राबाद’ परिसरात रहायचो तेव्हा कधीही वाटलं नव्हतं की, ‘कतार’मध्ये हाऊसफुल्ल प्रयोग करायची संधी मिळेल. जवळपास ८०० लोकांनी भरलेलं ते सभागृह, प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि पाणीपुरीच्या खमंग प्लेटनंतर सूकी पूरी मागावी तशी नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी केलेली कवितेची फर्माईश… माशा अल्लाह… काय मज्जा आली. मराठी माणसांना, रसिक प्रेक्षकांना जगात तोड नाही. कतार मराठी मंडळाने केलेलं उत्तम नियोजन आणि येतांना एअर ईंडियाच्या विमानांत बसलो तर केबीन क्रू इनचार्ज अनघा मॅडम होत्या. त्यांनी ओळखलं, विशेष काळजी घेतली आणि गिफ्टही दिलं. असा सगळा दौरा सुफल संपन्नं झाला”.
दरम्यान, संकर्षणने शेअर केलेलया या व्हिडीओमध्ये त्याच्या नियम व अटी लागू या नाटकाला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद व्यक्त करण्यात आला आहे. “अप्रतिम नाटक”, “तु हे सगळे deserve करतोय संकर्षण”, “खूप शुभेच्छा”, “खूप छान” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी संकर्षणचे कौतूक केलं आहे.