Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी नुकताच एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘टीम ए’मध्ये अरबाज, निक्की, सूरज, धनंजय आणि वर्षा यांचा समावेश होता. तर, ‘बी टीम’मध्ये अंकिता, पॅडी, अभिजीत, जान्हवी आणि संग्राम हे पाच सदस्य होते. त्यामुळे या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार? याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर या खेळात ‘टीम ए’नेच बाजी मारली. पहिल्या डावात अंकिता, पॅडीला सहज बाद करण्यात आलं. यानंतर धनंजयने दुसऱ्या फेरीत जान्हवी, संग्रामला बाद केलं. तिसऱ्या लढतीत संग्रामने टीमच्या बाजूने खेळण्याचा निर्णय घेतला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
यामुळे या डावात संग्राम-अरबाजमध्ये चांगली लढत पाहायला मिळाली. पण, शेवटी अरबाजने संपूर्ण ताकदीनिशी सर्वांना बाजूला काढलं आणि अभिजीतच्या घरट्यात अंड ठेवून त्याला बाद केलं. त्यामुळे ‘टीम बी’मधील सगळे सदस्य बाद झाले असून ‘टीम ए’मधील निक्की सोडून वर्षा, अरबाज, सूरज व धनंजय हे कॅप्टन्सीच्या पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे यांच्यात अंतिम लढत होऊन कुणी तरी एक या घरचा नवीन कॅप्टन होणार आहे आणि नुकताच याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये कॅप्टन्सीच्या सदस्यांना बाकीच्यांची तहान भागवायची आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपले पाणी पिण्याची विनंती घरातील सदस्यांना करतानाचे यात पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमधून निक्की-अरबाज यांच्यात पुन्हा बाचाबाची होणार की काय? असं दिसत आहे. यात अरबाज “मी खूप गोड पाणी आहे” असं म्हणताच निक्की त्याला सुनावत असं म्हणते की, “कालपर्यंत तू कडू होता आणि आता अचानक तू गोड कसा काय झाला?”.
तर पुढे पॅडी वर्षा यांना असं विचारतो की, “तुम्हाला विश्वास होता की आम्ही खेळू म्हणून…” यावर वर्षा “हो… असं वाटलं होतं” हे उत्तर देतात.पुढे पॅडी वर्षा यांना सुनावत असं म्हणतात की, “तुम्ही स्ट्रॅटेजी बनवायला त्यांच्याबरोबर बसता आणि विश्वास आमच्यावर ठेवता…” त्यामुळे आता वर्षा व पॅडी यांच्यात यामुळे मोठा वाद होणार का? या घराला नवीन कॅप्टन कोण मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.