‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा यावर्षी २६ फेब्रुवारी रोजी पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. दोघे एकमेकांबरोबरचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तसंच अभिनेत्री तितीक्षाही तिच्या युट्यूब व्लॉगच्या माध्यमातूनही आयुष्यातील आही खास क्षण शेअर करत असते. अशातच तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून तिने कोकण सफारी घडवून आणली आहे. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Kokan Safar)
अभिनेत्री तितीक्षा तावडे ही कोकणातली आहे आणि कोकणात नवीन लग्न झालेली जोडप्यांचा लग्नानंतर ओवसा करण्याची पद्धत असते. याच ओवसासाठी ती नवरा सिद्धार्थबरोबर कोकणात गेली होती. या कोकण प्रवासाची झलक तिने या युट्यूब व्हिडीओमधून दाखवली आहे. यात अभिनेत्रीने कोकण रेल्वेने प्रवास केला असून या प्रवासात त्यांना त्याबद्दल पाच तास उशीर झाला. या वेळेत दोघांनी रेल्वे स्टेशनवर केलेल्या मजामस्तीचीची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबई ते कोकण प्रवास, कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव, ओवसा पूजन, देवदर्शन आणि कुटुंबियांबरोबरची मजामस्ती याचे खास क्षण तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरजचं डीपी दादाला उलट उत्तर, अंकिताची मध्यस्थी, म्हणाली, “त्यांना असं बोलू नको कारण…”
त्यानंतर सिद्धार्थ-तितीक्षा कणकवलीला पोहोचताच त्यांना आई-बाबा घेण्यासाठी पोहोचले. यानंतर दोघांनी गाडीने प्रवास करत घर गाठलं आणि अखेर गावच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी तितीक्षाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर तितीक्षाने तिचे ओवसा पूजनही केलं. या ओवसापूजनाची खास झलकही तितीक्षाने तिच्या या व्लॉगमधून दाखवली आहे. त्यानंतर तितीक्षाने नवऱ्याला तिच्या गावची भातशेती दाखवली. तितीक्षा तिच्या गावी दोन वर्षांनी गेली असून याबद्दलच्या आनंदी भावना तिने व्यक्त केल्या आहते.
पुढे तितीक्षाने कोकणातील पारंपरिक पद्धतीने ओवसा पूजन केले आणि या सर्व पूजेची झलक तिने या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. यावेळी तितीक्षाने “गौरीपूजनाच्या दिवशी, बाप्पाच्या साक्षीने घेतला वसा, सिद्धार्थचे नाव घेते येवा कोकण आपलोच असा” असा खास उखाणाही घेतला. तर बायकोसाठी सिद्धार्थनेही “गणपती बाप्पाला नैवेद्य मोदकाचा, मोदकात घातला खवा, तितीक्षाचं नाव घेतो तिच्या घोवाला कोकण दाखवा” असा हटके उखाणा घेतला आहे. यानंतर तावडे कुटुंबियांनी सिद्धार्थ-तितीक्षाला ओवस्यांची देवाण-घेवाण केली आणि मग दोघांनी त्यांच्या गावचे देवदर्शन घेतलं. यानंतर घरातील साग्रसंगीत जेवणावर ताव मारत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि परतीचा प्रवास केला.