Bigg Boss Marathi 5 : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा आता सातवा आठवडा सुरु आहे. या सातव्या आठवड्यात घरात एका नवीन सदस्याने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. सहा वेळा ‘मिस्टर इंडिया’, पाच वेळा ‘महाराष्ट्र श्री’ चा मानकरी ठरलेला संग्राम चौगुले याने बिग बॉस मराठीच्या घरात दणक्यात प्रवेश केला. ‘भाऊचा धक्का’वर शोचा होस्ट रितेश देशमुखने संग्रामचे स्वागत केले. संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल टाकताच छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार करत एण्ट्री केली. त्याच्या एन्ट्रीनंतर घरातील समीकरणात काय बदल होतील, याकडेही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या होत्या. बुधवारी प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. टास्कच्या दोन फेऱ्या पार पडल्या आणि यात ग्रुप ए ने आपला पॉवर गेम दाखवला असल्याचे दिसून आले.
वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर संग्राम चौगुलेची चांगलीच चर्चा रंगली होती. संग्रामच्या एन्ट्रीने ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाला एक वेगळाच ट्विस्ट आला. त्यानंतरच्या टास्कमध्ये संग्राम व अरबाजची जोरदार वादावादी झाल्याचीही पाहायला मिळाली. संग्रामने पहिल्याच दिवशी अरबाज व निक्कीबरोबर पंगा घेतला. त्यामुळे निक्की व अरबाजने संग्रामविरोधात मोहीमच उघडली. अशातच नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात रितेश संग्रामला त्याच्या खेळाबद्दल व घरातील वावराबद्दल सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये रितेश संग्रामला असं म्हणत आहे की, “तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात, पण ‘बिग बॉस’च्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात. तुम्ही कुठेच दिसत नाहीत. या घरात महाराष्ट्राला वाईल्ड कार्ड यावं आणि त्याने गेम पालटून टाकावा अशी अपेक्षा होती. पण या घरात तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून नाही तर माइल्ड कार्ड म्हणून आलेला आहात”.
या नवीन प्रोमोखाली प्रेक्षकांनीदेखील काही संमिश्र प्रतिक्रियांद्वारे आपली मतं व्यक्त केली आहेत. या नवीन प्रोमोखाली “संग्राम दादानी अरबाजला काही केल की लगेच तुम्ही आणि तुमची टोळी त्याला बाहेर काढणार. तुम्ही बिग बॉस नाही तर निक्कीचे गुलाम वाटता”, “खरच आहे संग्राम दादाने निराशा केलीय आमची. भिडलेच नाही कुठं”, “बर झाल ह्याला बोलले बाबा माझ्या संग्राम कडून खूप आपेक्षा होत्या. ते अरबाजची वाट लावेल म्हणून पण त्याने अरबाज ला काहीच केलं नाही”. अशा अनेक कमेंट्स करत काहींनी संग्रामच्या खेळाचे कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याचा खेळ दिसला नाही असं म्हटलं आहे.
दरम्यान, संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्राम फिटनेस फ्रिक असून २०१२ मध्ये त्याने ८५ किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. तर, २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. त्याने एकूण सहा वेळा मिस्टर इंडिया व पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकावला. संग्रामच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर, तो इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे.