सध्या ‘बिग बॉस’चे पाचवे पर्व खूप चर्चेत राहिले आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच अनेक वाद-विवाद पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी सोशल मीडियावर संगळ्यांनी निक्कीला खूप सुनावले होते. तसेच कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखनेदेखील निक्कीला चांगलाच दम दिला होता. त्यानंतर पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर व निक्कीमध्येदेखील मोठे वाद झाले होते. याचे मोठे पडसाद सोशल मीडियावर उमटले होते. अनेक कलाकारांनी पॅडीची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. (neha shitole on bigg boss marathi)
हे सगळं सुरु असतानाच आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ वादामुळेच चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आर्या जाधव व निक्की यांच्यामध्ये वाद झाले. यावेळी आर्याने निक्कीच्या कानशिलात लागावली. या सगळ्या प्रकरणामुळे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक कलाकारांनी या घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती व लोकप्रिय अभिनेत्री नेहा शितोळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिने तिचे याबद्दलचे मत मांडले आहे.
नेहाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने एक एक पोस्ट केली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले की, “कोणीही कोणत्याही कारणांनी कोणाच्याही बाबतीत केलेली जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच आहे. हा खेळ फक्त शारीरिकरित्या सक्षम राहून खेळण्याचा नाही. जिंकण्यासाठी मनाने खंबीर आणि संतुलित असणं खूप महत्त्वाचं व गरजेचं आहे”. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच कोणत्याही स्पर्धकाने कोणावरही हात उचलणे चुकीचं असल्याचेही म्हटले आहे.
हा प्रकार एका टास्कदरम्यान घडला आहे. वर्षाताई एका हिऱ्यावर लक्ष ठेवत असतात तेव्हा जान्हवी व आर्या हे सुद्धा त्यांना मदत करत असतात. त्यावेळेला निक्की मुद्दाम त्यांच्यामध्ये येते आणि त्यांना अडवून दाखवते. त्यावेळेला आर्याचा पारा चढतो आणि आर्या व निक्कीमध्ये बाचाबाची होते. निक्की मुद्दाम खोटेपणा करत असल्याचे पाहत आर्या तिला पकडते आणि तिच्या सणसणीत कानाखाली लगावते.