‘बिग बॉस मराठी’ हा टेलिव्हिजनवरील सगळ्यात वादग्रस्त शो आहे. भांडणं, वाद विवाद, हाणामारी यामुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वात अनेक कलाकार उत्तम खेळताना दिसत आहेत तर काहीजणांना हा खेळ सोडावा लागला आहे. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर या स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना पाहणं रंजक ठरत आहे. तर घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून संग्राम चौगुलेची एण्ट्री झाली आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
अशातच आता घरात सातव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. यंदाचा नॉमिनेशन टास्क ‘बिग बॉस’ने खास ठेवला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सगळ्या स्पर्धकांच्या गळ्यात एकमेकांचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. स्पर्धकांना नॉमिनेट करण्यापूर्वी योग्य ते कारण देणं अनिवार्य आहे. शिवाय वाईल्ड कार्ड एण्ट्री द्वारे झालेल्या टास्कमध्ये अपात्र स्पर्धकांना विहिरीत ढकलून द्यायचे होते.
आणखी वाचा – अखेर कंगना रणौतच्या मुंबईमधील वादग्रस्त बंगल्याची विक्री, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा झाला फायदा
अपात्र विहिरीत पडलेल्यांना आठवडाभर उकडलेलं जेवण मिळणार असल्याचे आणि तसंच त्यांना बेड वापरता येणार नसल्याचे बिग बॉस यांनी जाहीर केले. अशातच ‘बिग बॉस’ मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’, “शिक्षेस पात्र ठरवूनही काही सदस्यांनी लक्झरी प्रोडक्ट चोरले. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आता आपल्यावर मी कारवाई करत आहे”, असं बोलतात. दरम्यान प्रोमोमध्ये अरबाज व डीपी बेडरूममध्ये काहीतरी सामान जमा करताना दिसत आहेत.
त्यानंतर प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सूरज यंदाच्या आठवड्याचा कॅप्टन असल्याने तो सगळ्यांना एकत्र घेऊन बसतो, आणि या प्रकरणावर चर्चा करतो. यावेळी सूरज म्हणतो, “चुकी झाली नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल तसं मी वागेन पण ‘बिग बॉस’ मला बोलले तर मी तसा वागणार”, असं म्हणत जोरात डोक्यावर हात मारतो. आता सूरजचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. कॅप्टन म्हणून सूरज यावर काय ऍक्शन घेणार हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.