Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. त्यानंतर वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे सदस्य कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरतात. यामध्ये सूरज चव्हाणला या घरचा नवीन कॅप्टन होण्याचा बहुमान मिळतो. शुक्रवारच्या भागात कॅप्टन्सीचे उमेदवार असलेल्या स्पर्धकांसाठी एक टास्क दिला जातो, ज्यातून घरातील सदस्यांना कॅप्टन्सीच्या चार उमेदवारांपैकी एकाची कॅप्टन म्हणून निवड करायची असते. यात सगळे सदस्य ठरवून सूरजला घरचा नवीन कॅप्टन बनवतात. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही पाहायला मिळालं. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा देताना दिसत आहे. घरातील सदस्यांबरोबरच सामान्य प्रेक्षक व अनेक कलाकार मंडळींनीदेखील त्याच्या कॅप्टन्सीनिमित्त आनंद व्यक्त केला आहे. सूरजच्या अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे नवीन कॅप्टन झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अशातच शोचा होस्ट रितेश देशमुखनेदेखील सूरज कॅप्टन झाल्यानिमित्त त्याचं कौतुक केलं आहे. आजच्या भाऊचा धक्कावर रितेश सूरजला असं म्हणतो की, “अभिनंदन सूरज, खरंतर, अभिनंदन कॅप्टन सूरज. शेवटी तुमची इच्छा पूर्ण झाली”. यावर सूरज असं म्हणतो की, “गणपती बाप्पाने माझी इच्छा पूर्ण झाली”. यानंतर पॅडी मस्करी करत “आम्ही काहीच केलं नाही का?” असं म्हणतात. यावर सूरज असं म्हणतो की, “असं काही नाही. मी कॅप्टन व्हावं म्हणून माझ्या टीमनेही खूप प्रयत्न केले”.
यापुढे रितेश सूरजला त्याच्या कॅप्टन्सीबद्दलच्या भावना विचारतो. यावर सूरज असं म्हणतो की, “माझ्या टीमने मला खूप पाठींबा दिला आणि मला ताकद दिली की तू हे करु शकतोस आणि मी ते केलं”. यावर रितेश सूरजला धीर देत असं म्हणतो की, “या आठवड्यात जसं बोलत होतात. खेळत होतात तसंच बोलत रहा आणि काम करत रहा. योग्य त्या गोष्टींवर भूमिका घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे”.