Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या बराच चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळीमुळे यंदाचं पर्व विशेष गाजताना दिसत आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. घरात पहिल्या दिवसापासून निक्कीचे प्रत्येक स्पर्धकाशी वाद झालेले दिसले. ती गेमसाठी स्वत:च्या मित्रांबरोबर देखील भांडली. काही दिवसांपूर्वीच निक्कीने तिच्या मित्रांच्या ग्रुपमधून म्हणजे टीम ए मधून एक्झिट घेतली. आता निक्की व अरबाज एकत्र असून ते त्यांचा वेगळा खेळ खेळताना दिसत आहेत. टास्क दरम्यान, खटकलेल्या गोष्टींमुळे निक्कीने घरात एकही काम न करण्याचा निर्णय घेतला.
नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने निक्कीला नॉमिनेट केलं आणि ही गोष्ट तिला अजिबात पटली नाही. त्यामुळे ती वर्षा उसगांवकरांना याविषयी जाब विचारताना दिसली. सूरजने चुकीच्या निकषांवर मला नॉमिनेट केलं असं निक्कीचं बोलणं होतं. यावर उत्तर देत वर्षा यांनी, “नॉमिनेशन आणि काम न करणं या दोन गोष्टींचा उगाच संबंध जोडू नकोस”, असं निक्कीला सांगितलं. यावर “तुम्हाला माझं ऐकायचं नसेल, तुम्ही माझ्यासाठी स्टॅण्ड घेतला नाही त्यामुळे मी घरातलं एकही काम करणार नाही. मी वॉशरुम ड्युटी करणारच नाही” अशी भूमिका निक्कीने घेतली.
घरातील काम करणार नाही हे कळताच घरातील स्पर्धक भडकले. जान्हवीने मी बनवलेलं जेवण निक्कीला देणार नाही. तिला हवं तर करून खाईल नाहीतर अरबाज देईल, असं सगळ्या घरासमोर निक्कीला सांगितलं. आणि यावरुन दोघींमध्ये जोरदार भांडण झालं. या निक्कीच्या अरेरावी पणामुळे आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सुरेखा कुडची तिच्यावर भडकलेल्या दिसत आहेत. सुरेखा यांनी एक पोस्ट शेअर करत निक्कीला खडेबोल सुनावले आहेत.
आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”
निक्कीच्या वागणुकीवर आक्षेप घेत त्यांनी पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, “ही निक्की कालच्या एपिसोडपासून डोक्यात गेलीच होती. आज तर कहरच केला. गेममध्ये किती फालतुगिरी करते. चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला. बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर ऐकून पण घ्यायचं नाही. स्वत:चंच खरं करायचं. बघावं तेव्हा त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून बसलेली असते. असो आपण कितीही बोंबललो तरी ‘बिग बॉस’ निक्कीला ना शिक्षा करणार, ना बाहेर काढणार. कंटेंट देतेय ना. शी शी लाज काढलीये या बाईईईने”. असंख्य नेटकऱ्यांनी निक्कीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केलेली दिसली.