Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. एकामागोमाग एक स्पर्धकांमध्ये सुरु असलेले वाद पाहणं रंजक ठरत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांच्यात मैत्री पाहायला मिळाली. गळ्यात गळे घालून, एकमेकांची काळजी घेताना त्या दिसल्या. दोघीही एकमेकांशिवाय राहत नसताना आता त्यांच्यात वाद झाला आहे. निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिची वागणूक बदललेली जान्हवीला खटकली. आणि यावरुन जान्हवीने अरबाजसह गॉसिप केलं. हे गॉसिप भाऊच्या धक्क्यावर पाहून निक्कीला खूप मोठा धक्का बसला.
निक्कीला टिमने केलेली गद्दारी सहन झाली नाही म्हणून तिने टीम ए मधून एक्झिट घेतली. आणि तिने जान्हवीबरोबरची मैत्रीही तोडली. त्यानंतर निक्की व जान्हवी यांच्यात बरेचदा वाद झालेला पाहायला मिळाला. निक्की व जान्हवी यांच्यात झालेला वाद हा वाढत गेला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या भागात निक्कीने नॉमिनेशन प्रक्रियेत चुकीचा निर्णय घेतल्याने कॅप्टन वर्षा यांनी साथ दिली नसल्याचं कारण देत घरात कोणतंच काम न करण्याचा निश्चय केला.
निक्कीचा हा निर्णय कोणालाच पटला नाही. निक्कीच्या विरोधात संपूर्ण घर उभं राहील. काही स्पर्धकांनी निक्कीला समजावलं मात्र निक्कीने कोणाचंच म्हणणं ऐकलं नाही. आणि ठामपणे घरातील सगळी काम न करण्याचं सांगत सोफ्यावर बसून राहिली. यानंतर आता एक प्रोमो समोर आला आहे, या प्रोमोमध्ये निक्की व जान्हवी यांच्या वाद झालेला पाहायला मिळत आहे. कोणतंच काम न करणाऱ्या निक्कीला घरातील जेवण जेवण्याचा, राशन वापरण्याचा अधिकार नाही असं जान्हवीने या वादाद्वारे म्हटलं.
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जान्हवी म्हणते, “घे बनव स्वतःच्या हाताने आणि गिळ”. यावर निक्की म्हणते, “कोण आहे गं तू. चल निघ. माझ्या वाकड्यात गेलं तर मी कसा त्यांचा गळा पकडते हे माझ्याकडून शिकावं”. यावर जान्हवी असं बोलताना दिसत आहे की, “ती तर निर्लज्जच आहे. तिला सर्व फुकटच पाहिजे. थोडीतरी लाज असेल तर मी बनवलेलं दुसऱ्या ताटातलं ती खाणार नाही”.