Paaru Serial Upcoming Episode : ‘पारू’ या मालिकेत सध्या रक्षाबंधन विशेष भाग पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनला किर्लोस्कर घरात काम करणाऱ्या सर्व महिला या आदित्य व प्रीतमला राखी बांधतात. ही संधी साधत दामिनी पारू व प्रियालाही राखी बांधायला सांगते. मात्र प्रिया यावेळी दामिनीला सडेतोड उत्तर देत मी इथे काम करते आणि मी इथे कोणाला भाऊ बनवायला आले नाही, असं सांगून बाजूला होते. तर इकडे आता पारू समोर मोठा प्रश्न पडतो. पारूला आदित्यबरोबर भावा-बहिणीच्या बंधनात अडकवण्यासाठी दामिनीचा नवा डाव पाहायला मिळत आहे. आदित्य पारूकडून राखी बांधून घेणार की नाही हे आगामी भागात पाहणं रंजक ठरेल.
दरम्यान मालिकेत जुन्या नात्यांचा नवा अध्याय सुरु होताना पाहायला मिळणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी अहिल्या देवींनाही त्यांच्या सख्ख्या भावाची आठवण येते. त्या त्याच्या आठवणीत भावुकही होतात. दुरावलेल्या या नात्यांचा एक प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळालं की अहिल्यादेवी त्यांच्या भावाला राखी पाठवतात. तर यावेळी हे देखील समोर येत की, प्रिया ही अहिल्यादेवींच्या भावाची मुलगी असते.
तर समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रिया बोलत असतात. तेव्हा प्रीतम प्रियावरील प्रेमाची कबुली देतो. मात्र हे प्रेम प्रिया मान्य करत नाही. प्रोमोमध्ये प्रितम म्हणतो, “प्रिया मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी आताच जाऊन आईला सगळं सांगतोय.” त्यावर प्रिया म्हणते, “थांबा प्रतिम सर, तुम्ही सांगाल अहिल्या मॅडमना. पण माझ्या आबांचं काय?” मग प्रितम विचारतो, “कोण आहेत तुमचे आबा?”
तेव्हा प्रिया सांगते, “सयाजी राव भोसले. खऱ्याबरोबर नेहमी उभे राहणारे आणि खोट्याला आयुष्यात जागा न देणारे.” हे ऐकून प्रितमला आश्चर्याचा धक्काच बसतो. प्रितम व प्रियाच्या लव्हस्टोरीमुळे दुरावलेली नाती जवळ येतील की या नात्यात आणखी फूट पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.