Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या वर्षाने अल्पाधितच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सर्वत्र या पर्वाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात स्पर्धकमंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. कॅप्टन्सी टास्कसाठी भांडण, वाद, धक्काबुक्की सगळं काही पाहायला मिळालं. त्यामुळे आता या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कसाठी कोणता स्पर्धक विजय मिळवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान झालेल्या टास्क मध्ये एका स्पर्धकाच्या खेळाचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण.
टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’ने खूप मोठी संधी दिली. खेडेगावातून आलेल्या या सूरजला ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीचे दिवस कठीण वाटत होते. गेम कळत नसल्याने स्पर्धकांसह कसं आणि काय बोलायचं हा प्रश्न सूरजसमोर कायम असायचा. मात्र ‘बिग बॉस’ यांनी न घाबरता खेळ असं सांगताच सूरजला धीर मिळाला. आज संपूर्ण महाराष्ट्र सूरजवर भरभरुन प्रेम करत आहे. केवळ प्रेक्षकमंडळीच नव्हे तर बरीचशी कलाकार मंडळी सूरजच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.
अशातच नुकत्याच कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या स्पर्धेत सूरजने आपला इंगा दाखवला. सूरजचा हा गुलिगत पॅटर्न बघून कलाकार आणि प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत. या नवीन प्रोमोमधून सूरज त्याच्या हटके स्टाइलने सर्वानाच थक्क करताना दिसून येत आहे. अरबाज, वैभव, निक्की व जान्हवी यांना तो पुरून उरला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सूरजचा हा भडकलेला लूक पाहून साऱ्यांनाच भीती वाटली. त्याच्या या उत्तम खेळाचं वर्षा ताई यांनीही कौतुक केलं. त्यावेळी सूरजने खेळादरम्यान घडलेल्या संवादाचा खुलासा केला.
वर्षा ताई सूरजला म्हणतात, “खूप छान खेळलास”. यावर सूरज म्हणतो, “मला तो थांबवत होता तेव्हा खूप चीड येत होती”. यावर वर्षा ताई म्हणाल्या, “पुढच्या वेळी कोण काय बोलतंय त्याच्याकडे लक्षचं द्यायचं नाही, उत्तरचं द्यायचं नाही”. यावर सूरज म्हणतो, “त्याला मी सहज मानेवर उचलला आहे. माझी पावर किती आहे ती बघा. आणि मग मी सुटलो रे सुटलो. तो मला काय म्हणाला, तुला मी पाण्यात फेकून दिल असतं. त्याला मी म्हणालो, तू पाण्यात फेकशील पण मी पाण्यातून बाहेर आलो की काय करणार हे तुला कळणार पण नाही. मी खूप गावठी पॅटर्न आहे”.