Aamir Khan News : ‘दंगल’, ‘पीके’, ‘तलाश’, ‘गजनी’, ‘तारे जमीन पर’, ‘थ्री इडियट्स’ ‘लगान’ यांसारख्या अनेक लोकप्रिय व गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता म्हणजे आमीर खान. त्याने अनेक हिट व गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा पडता काळ सुरु झाल्याचे जाणवत आहे. प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. आमीर खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट हा ‘लाल सिंग चड्ढा’ होता. या चित्रपटात करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्यदेखील दिसले होते. मात्र हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यानंतर आमीर कोणत्या चित्रपटात दिसून आला नाही. त्यामुळे अभिनेता अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत आहे की काय अशा चर्चा रंगल्या आहेत आणि याच चर्चांना दुजोरा देण्याचे काम त्याच्या लेकाने केलं आहे. (Aamir Khan is going to be retired)
अलीकडेच आमीरचा मुलगा जुनैद खान याने नेटफ्लिक्सच्या ‘महाराज’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. जुनैदचा हा चित्रपट चाहत्यांना खूप पसंतीस पडला आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक होत आहे. त्यामुळे आमीरसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हे वर्ष चांगले जात आहे. लेकाच्या चित्रपटालं मिळणारे यश पाहीन आमीरने नुकतीच ‘महाराज’साठी एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी जुनैदने आमीरबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानने सांगितले की, त्याचे वडील म्हणजेच आमीर खान यांनी निवृत्तीचा विचार केला होता.
याबद्दल जुनैद म्हणाला की, “‘पीके’ चित्रपटाच्या सेटवर मी कॅमेराच्या मागे होतो. अनेक जाहिरातींच्या शूटिंगमध्येही मी मदत केली आहे. ‘महाराज’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी ‘आमीर खान प्रोडक्शन’च्या एका चित्रपटात काम करत होतो. तेव्हा किरण राव ‘लापता लेडीज’ चित्रपतावर काम करत होती आणि वडील म्हणाले की “मी आता निवृत्त होत आहे. तू हे सगळं का सांभाळत नाहीस. तेव्हा मी नुकतंच या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मला प्रोडक्शन चांगल्याप्रकारे समजतं, असं वाटतं. पण चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेतील ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे”.
त्याबरोबरच आमिर खानच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्याच्यावर काहीही प्रभाव न पडल्याचा खुलासाही जुनैदने केला. “त्यांनी चांगलं काम केलं आहे. चित्रपट बनवणं हे कोणतं शास्त्र नाही. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे”, असंही जुनैद म्हणाला. दरम्यान, जुनैदचा ‘महाराज’ सिनेमा २१ जूनला प्रदर्शित झाला होता. नेटफ्लिक्सवर आमिरच्या लेकाचा हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात जुनैद खान, शर्वरी वाघ, जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले.