Bigg Boss Marathi 5 Update : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ शोचा रविवारी थाटात ग्रँड प्रीमियर पार पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. यावेळी आपल्या खास शैलीने राजकीय व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत राहणारा छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडेनेही या घरात प्रवेश केला. त्याच्या एण्ट्रीनेच त्याने सर्वांची मनं जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात त्याने प्रवेश करताच रितेश देशमुखही त्याच्यासाठी गुडघ्यावर बसला. राजकीय भाष्य करणारा आणि गावागावांत प्रसिद्ध असलेला छोटा पुढारी आता बिग बॉसच्या घरात गेला आहे. त्याचा हा प्रवास कसा होता? चला जाणून घ्या… (Bigg Boss Marathi 5 Chota Pudhari)
घन:श्याम राजकारणापासून ते तालुका व राज्यातील राजकीय परिस्थितीवर बिनधास्त बोलतो. जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकाऱ्यांनी अनेक जण निरूत्तर होतात. वीज, पाणी, शेती, सहकार, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नांवर तो बेधडक त्याची मतं मांडतो. विशेष म्हणजे त्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशी त्याची उदाहरणे परिपक्व असतात. २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या भाषणाच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर अनेक माध्यमांनी त्याच्या मुलाखती प्रसारित केल्याने छोटा घन:श्याम रातोरात स्टार झाला.
शेतकरी कुटुंबात तो वाढला. त्याच्या घरची परिस्थिती ही अगदी जेमतेम आहे. बहिणीनंतर घन:श्याम आई-वडिलांना हा एकुलता एक मुलगा आहे. २०१९ विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्याला खरी लोकप्रियता मिळाली. माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या विरोधात त्याने राहुल जगताप (राष्ट्रवादी) यांचा प्रचार केला. त्याच्या भाषणांना टाळ्यांचा पाऊस पडत होता. पाचपुते पडले आणि जगताप आमदार झाले. यामुळे घन:श्यामचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा हा आत्मविश्वास त्याला ‘बिग बॉस मराठी’पर्यंत घेऊन आला आहे.
घनश्यामला वाचनाची आवड आहे. स्थानिक ते जागतिक घडामोडींवर त्याचे लक्ष असते. महाराष्ट्र, भारत याशिवाय परदेशातील राजकीय घडामोडींवरही तो भाष्य करत असतो. घन:श्यामचे सोशल मीडियावर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. राजकीय भाषणांमुळे चर्चेत राहणारा हा ‘छोटा पुढारी’ ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आला आहे. त्यामुळे या घरात तो काय जादू करणार?, या घरात त्याचा कितपत निभाव लागणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.