देशभरात सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र या लग्नाचे वारे वाहत असतानाच अनेक स्पेशल गाण्यांवर वऱ्हाडी मंडळी ठेका धरतानाही दिसले. या शाही लग्नात बॉलिवूडसह मराठमोळ्या गाण्यांनीही भुरळ घातलेली दिसली. या गो दांड्यावर या कोळीगीताने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि वर्हाडी मंडळींना ठेका धरायला लावला. इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी आलेल्या गुलाबी साडी या गाण्याचीही भुरळ या लग्नात पडलेली पाहायला मिळाली. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
‘गुलाबी साडी’ या गाण्याची जगभरात क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडीवर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. कलाकार मंडळींपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला या गाण्याने भुरळ घातली. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड केलं. संजू राठोडचं हे गाणं तुफान व्हायरल झालं. आणि आता अंबानींच्या लग्नातही संजू राठोडच्या गुलाबी साडीची हवा पाहायला मिळाली.
संजूने स्वतः परफॉर्म करत गुलाबी साडी या गाण्याने उपस्थितांना ठेका धरायला लावला. अनंत अंबानीही या गाण्यावर त्याच्या मित्रांसह ठेका धरताना दिसला. प्रसिद्ध रॅपर किंग घोषणा करताना दिसत आहे की, “तुम्ही गुलाबी साडीसाठी तयार आहात का?” तेवढ्यात संजू स्टेजवर येतो आणि गुलाबी साडी या गाण्यावर जबरदस्त परफॉर्म करतो. संजू राठोडने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. संजूचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संजूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. “एक मराठी कलाकार अखंड बॉलिवुडवर भारी पडला. भावा तुच रे विषय हार्ड”, “अंबानी सगळ्यांना नाचवतात पण भाऊने त्याच्या गाण्यावर अंबानीला नाचवलं”, “खरंच खूप खूप आनंद वाटतो. जेव्हा सामान्य कुटुंबातुन एखादी व्यक्ती पुढे जातो आणि संपूर्ण जगात नाव कमावतो”, “या लग्न सोहळ्यातला सर्वात भारी व्हिडीओ”, अशा अनेक कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.