देश-विदेशासह सर्वत्र सध्या एकाच लग्नाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत-राधिका यांच्या लग्नाची. १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चेंट विवाहबद्ध झाले. सलग चार दिवस जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाचा रिसेप्शन सोहळा सुरु होता. तसं बघायला गेलं, तर मागच्या पाच महिन्यांपासून हा लग्न सोहळा सुरु आहे. जामनगर येथे प्री-वेडिंग सेलिब्रेशनने या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. लग्नाच्या दिवशी फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती, उद्योजक, हॉलिवूड स्टार्स या लग्नाला हजर राहिले होते. या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाबाजूला डोळे दिपवून टाकणारा भव्य नेत्रदीपक सोहळा होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भक्तीरस, अध्यात्म, अन्नदानसुद्धा होतं.
मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कसलीच कमी भासू दिली नाही. अनेक दिग्गज व बड्या कलाकारांना लेकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले असून अनेकांनी या लग्नसोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवत चार चाँद लावले. राजकारण, मनोरंजन, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली आहे. तसेच भारतीय संगीत क्षेत्रातील मातब्बर लोकांनीदेखील अंबानींच्या लेकाच्या लग्नात खास उपस्थिती लावली आहे. लोकप्रिय मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास सादरीकरण केले. याशिवाय शंकर महादेवन, हरिहरन, सोनू निगम यांच्यासह गायिका श्रेया घोशाल आदी सांगीतिक मंडळींनी अनंत व राधिका यांच्या लग्नात गायनसेवा केली.
अशातच काल अनंत-राधिका यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला. काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये अनंत अंबानी दिसत असून गोल्डन रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये अंबानींची धाकटी सून पाहायला मिळत आहे. यावेळी राधिका पाहुण्यांना नमस्कार करताना दिसत आहे. तिच्या याच कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अशातच त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यात कोळीगीत ऐकू येत आहे. ‘या गो दांड्यावरना’ हे पारंपरिक गाणं ऐकू येत आहे. मानव मंगलानी या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यामध्ये नीता अंबानी व त्यांच्या लेकींमधील काही खास क्षण पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अंबानीच्या लग्नात मराठी पारंपरिक लोकगीत वाजल्याचे पाहून अनेकांना आनंद झाला आहे. अनेकांनी याचे कौतुक केलं असून “लग्न कोणाचाही असो गाणी ही कोळीगीतच लागतील”, “कार्यक्रम कोणाचाही असो आगरी कोळी गाणी वाजल्या शिवाय लग्न पूर्ण होतं नाही” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.