सध्या सगळीकडे अंबानी कुटुंबाची चर्चा सुरू आहे. अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नाची हवा आहे. १२ जुलै रोजी अनंत व राधिका हे मुंबई येथी जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी आलेल्या पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले. लग्नाच्या काही दिवस आधी अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली होती. हळद व संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडिओदेखील समोर आले होते. यावेळीही त्यांनी सर्व भारतीय परंपरा जपल्याचे दिसून आले. (nita ambani mehndi)
दरम्यान शाही विवाहसोहळा संपन्न होईपर्यंत अंबानी कुटुंबातील सर्व महिलांच्या पेहरावांची अधिक चर्चा रंगली होती. राधिकाचा संगीत लुक, हळदीचा लुक मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे अंबानी कुटुंबाची राजकुमारी ईशा अंबानीच्या ड्रेसेसची देखील सगळ्यांनी स्तुति केली. त्याचप्रमाणे आकाश अंबानीची पत्नी श्लोका अंबानीदेखील चांगलीच चर्चेत राहिली. अशातच नवरदेवाची आई नीता अंबानी यांच्या पेहरावाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांनी आजवर प्रत्येक सोहळ्यामध्ये भारतीय प्रथा व परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच त्यांच्या मेहंदीची चर्चाही झाली.
नीता यांच्या मेहंदीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल प्रेम दिसून येत आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या आपल्या हातावरील मेहंदी दाखवत आहेत. तसेच या मेहंदीमध्ये काय खास आहे हेदेखील सांगताना दिसत आहेत. नीता यांनी मेहंदीमध्ये पती मुकेश अंबानी यांचे नाव लिहिले आहे. त्याचप्रमाणे मुलं, जावई, नातवंडांची नावंही लिहिलेली दिसत आहेत. नीता यांच्या एका हातावर राधा-कृष्णाची प्रतिमा असलेली मेहंदी आहे. तसेच उलट्या हातावर अनंत व राधिका यांचे नाव लिहिलेले आहे.
तसेच नीता यांच्या दुसऱ्या हातावर मोठा मुलगा आकाश त्याची पत्नी श्लोका, मुलगी ईशा व तिचे पती आनंद, मुलं कृष्णा व वेदा यांचे नाव लिहिले आहे. नीता यांच्या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. नीता यांच्या हातावर असलेली मेहंदी वीणा नागदाने काढली आहे. ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट आहे.