‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ऐश्वर्या यांनी आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.सोशल मीडियावरही ऐश्वर्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या या फिटनेस फ्रिक असून नेहमीच सोशल मीडियावरुन योगा, जिमचे व्हिडीओ शेअर करतात. वयाची पन्नाशी जवळ आली असली तरी या अभिनेत्रीचं तारुण्य तरुणाईला लाजवेल असं आहे. अभिनय, सौंदर्य याशिवाय त्या सोशल मीडियावरील वावरामुळे नेहमीच चर्चेत असतात. (Aishwarya Narkar On Trolling)
ऐश्वर्या या सोशल मीडियावर सक्रिय असण्याबरोबरच अनेकदा परखड मत मांडताना दिसते. अनेकदा ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेकदा अभिनेत्री ट्रेंडिंग रीलमुळे चर्चेत असली तरी तिला ट्रोलिंगचा शिकारही व्हावं लागलं आहे. ऐश्वर्या नारकर यांचे अविनाश नारकरांबरोबरचे अनेक रील व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. तर बरेचदा या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत त्यांना ट्रोलही करतात.
अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांना एकट्याला योगा करताना पाहून नेटकऱ्याने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. यावर नेटकऱ्याने कमेंट करत “नवरा फक्त नाचायच्या वेळेसच असतो वाटतं. योगा करायला पण घेत जा”, अशी कमेंट करत अभिनेत्रीला डिवचलं आहे. यावर कमेंट करत ऐश्वर्या यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे. “आपण फक्त बोलण्यात वेळ घालवू नका. आम्ही फिटनेसकडे लक्ष देतो. तुम्ही पण ते करा. स्वतःची लायकी कशाला सिद्ध करताय”, असं परखड भाष्य केलं आहे.

यावर पुन्हा कमेंट करत त्या नेटकऱ्याने, “मला तुमच्या बद्दल आदर आहे पण जे खटकते (नाचतानाचे तोंड) ते बोललो. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी”, असं म्हटलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी पुन्हा कमेंट करत त्या नेटकऱ्याची चांगलीच शाळा घेतली आहे. “सॉरीचा प्रश्न नाही. बोलण्याची पद्धत असावी. कोणाला काय बोलतोय याचं भान असावं”, असं उत्तर ऐश्वर्या यांनी दिलं आहे. शिवाय ऐश्वर्या यांनी ही पोस्ट आणि कमेंट स्टोरीला रिपोस्ट करत “स्वतःच्या दोन पोस्ट आणि आवाज किती तुमचा”, असं म्हणत नेटकऱ्याला टॅगही केले आहे.