‘बिग बॉस’ म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगभरात बोलबाला असलेला मनोरंजनाचा खास कार्यक्रम, छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमात बिग बॉसचे नाव घेतले जाते. हिंदी ‘बिग बॉस’सह प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’देखील तितक्याच आवडीनं पाहतात. त्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे पर्व कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठी’च्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळी महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख शो होस्ट करणार असल्याचेही समोर आले.
‘बिग बॉस’चे आतापर्यंत चार पर्व झाले असून हे चारही पर्व चांगलेच गाजले. त्यामुळे आता पाचव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या प्रोमोनंतर दुसरा प्रोमो कधी प्रदर्शित होणार? याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. अखेर ‘बिग बॉस’ प्रेमींची ही उत्सुकता संपली आहे. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.
‘बिग बॉस’च्या या नवीन प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याचा ‘लय भारी’ अंदाज पाहायला मिळत आहे. रितेशची ‘बॉस’गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं या प्रोमोवरुन दिसलं. त्यामुळे “आता मी आलो आहे तर मग कल्ला होणारच” असं त्याने म्हटलं आहे. रितेश चा हा स्वॅग त्याच्या चाहत्यांसह ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांनादेखील चांगलाच आवडला आहे.


‘बिग बॉस’च्या या नवीन प्रोमोखाली अनेक चाहत्यांनी व ‘बिग बॉस’मध्ये आतापर्यंत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी कमेंट्सद्वारे त्यांना आनंद झाल्याचे म्हटले आहे. शिव ठाकरेने “आता मज्जा येईल, गणपती बाप्पा मोरया” असं म्हटलं आहे तर, किरण मानेंनी रितेशभाऊ कल्ला तर झालाच पाहिजे तो पण रागंड्या स्टाइलने” असं म्हटलं आहे. तसेच अमृता धोंगडेने “लय भारी, आता मजा येणार”, अपूर्वा नेमळेकरने “कमाल, खूपच उत्सुक आहे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर विशाल निकमने “जाळ अन् धूर संगटच, ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” आणि उत्कर्ष शिंदेने “कोणी हसणार कोणी रुसणार कोणी डोळे पुसणार कितीही मेकअप करा खरा चेहरा दिसणार” अशी हटके कमेन्ट केली आहे.