मनोरंजन विश्वातला सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. टीव्हीवरील हाच लोकप्रिय शो आता ओटीटीवरही गाजत आहे. हा शो नुकताच सुरु झाला असून सध्या या शोची व शोमधील स्पर्धकांची चांगलीच चर्चा सुरु आहे. या शोमध्ये हिप-हॉप कलाकार नावेद शेख उर्फ रॅपर नेझीही सहभागी झाला आहे. नुकतंच त्याने घरातील इतर स्पर्धकांशी ‘गली बॉय’ या चित्रपटाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. झोया अख्तरच्या या चित्रपटात रणवीर सिंगने एका रॅपरची भूमिका साकारली आहे, जी नेझीच्या आयुष्यावर आधारित आहे असं प्रेक्षकांना वाटलं.
‘गली बॉय’ चित्रपटाचा आणि त्याच्या यशाचा रॅपर नेझीच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? हे सांगताना नेझी असं म्हणाला की, “माझे पहिले गाणे हिट झाले असले तरी या चित्रपटातून मी प्रसिद्ध झालो. यामुळे मला मुख्य प्रवाहातील प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली. या चित्रपटामुळे मला फायदा झाला असला तरी नुकसानही झालं. माझ्या मानसशास्त्रावर, वैयक्तिक आयुष्यावर याचा परिणाम झाला. मला दोन मैत्रीणी असलेल्या या चित्रपटात दाखवण्यात आले आहे, मीए गरीब दाखवलो आहे, जे मी कधीच नव्हतो”.
यापुढे नेझी असं म्हणाला की, “ही एक काल्पनिक कथा असल्याचे निर्मात्यांनी सांगूनही, प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग ती कथा माझीच असल्याचे मानत राहिला. लोक माझ्याकडे नकारात्मक नजरेने पाहू लागले. चित्रपटातील पात्राशी, माझ्या प्रवासाची तुलना करू लागले. त्यांना ही माझी कथा वाटली. रणवीर जे काही करत आहे, तो मीच आहे असं त्यांना वाटत राहिलं”.
तसेच यापुढे नेझी अभिनेता रणवीर सिंगसोबतच्या बॉण्डबद्दल बोलताना असं म्हणाला की, “शुटिंगदरम्यान आम्ही खूप चांगले मित्र झालो. तो माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना भेटला आणि आम्ही एकत्र फोटो काढले. त्यांनी माझी दीपिका मॅडमशीही ओळख करून दिली”.
दरम्यान, नेझीने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये खुलासा केला की, झोया अख्तरने नेझीचे ‘आफत’ गाणे ऐकले होते आणि त्याद्वारे त्याचा शोध घेतला होता. झोया यांना हे गाणे आणि हा प्रकार खूप आवडला. हा चित्रपट एका काल्पनिक कथा व संपूर्ण समाजावर आधारित होता.