‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील रुपाली या पात्रामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेशिवाय त्या सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ट्रेंडिंग रीलवर डान्स व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. या ट्रेंडिंग रीलमुळे बरेचदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र वेळोवेळी त्यांनी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तरही दिलेलं पाहायला मिळत आहे. (Aishwarya Narkar On Complement)
नुकतीच ऐश्वर्या यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना “रुपाली म्हणून प्रत्यक्षात मिळालेली कॉम्प्लिमेंट तुम्हाला आठवतेय का?”, असा प्रश्न ऐश्वर्या यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “प्रत्यक्षात भेटल्यावर लोक काहीच म्हणत नाहीत. प्रत्यक्षात भेटल्यावर किती छान चाललंय, किती छान काम करता असं म्हणतात. पूर्वी जशी पत्र असायची त्यावर आपलं नाव, गांव असायचं त्याऐवजी आता सोशल मीडिया आहे. पण याचाही अनेकजण दुरुपयोग करताना दिसतात. कोणीही कुठल्याही नावाने अकाउंट उघडतं, त्यावरुन काही बोललं जातं. तर तो एक मला न आवडणारा प्रकार आहे. आणि त्यामुळे प्रत्यक्षात कमेंट्स येतात.
पुढे त्या म्हणाल्या, “मध्यंतरी रीलवर मला अशा कमेंट येत होत्या की, ही बाई मरत का नाही?, हिचं ऍक्सिडंट होऊन ही मरत का नाही?, तेव्हा माझं असं झालं की, ही कमेंट मला का आली असेल?. मी ना तर कोणाचं वाईट केलं आहे. म्हणजे मुंगी चिरडली तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं इतकी मी हळवी आहे. आणि मग माझ्या बाबतीत लोकं इतकं वाईट का आणि कशासाठी बोलत असतील?, नुसता डान्स आणि रील बघून बोलणं हे मला सुज्ञ वाटलं नाही कारण तसं राग येण्याइतकं आपण काही करत नाही”.
“आपली तत्व, मर्यादा लक्षात ठेवून आपण वावरत असतो. यावर विचार केल्यावर मला असं जाणवलं की, कदाचित ट्रोलर्स माझ्याकडे रुपाली म्हणून पाहत असतील. मी स्क्रीनवर जशी वागते तशीच मी खऱ्या आयुष्यात आहे असं त्यांना कदाचित वाटतं असेल म्हणून या कमेंट्स असतील. आणि हे मला मान्य आहे”, असं म्हणत त्यांनी कॉम्प्लिमेंटबाबत भाष्य केलं आहे.