टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत महत्त्वाचा मुद्दा मांडला. मुंबईतील फिल्मसिटीजवळ असलेल्या रस्त्यावरील कचरा दाखवत त्याने प्रशासनाला आणि नागरिकांनाही प्रश्न विचारला आहे. अभिनेत्याच्या या संतापजनक पोस्टची दखल बीएमसीने घेतलेली पाहायला मिळत आहे. अवघ्या २४ तासांत बीएमसीने तो रस्त्यावरील कचरा साफ केला आहे. आणि याचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत शशांकला टॅगही केलं आहे. (Shashank Ketkar On BMC)
बीएमसीने दखल घेतल्यानंतर शशांक केतकरने ती पोस्ट रिपोस्ट करत असे लिहिले आहे की, “पालिकेने तातडीने कारवाई केली यासाठी मनापासून आभारी आहे. आता पुन्हा तिथे कचरा जमणार नाही या साठी काहीतरी ठोस पावलं उचला!! आणि फक्त तो परिसर नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ ठेवूया. पालिकेइतकीच नागरिकांचीही ही जबाबदारी आहे”. याशिवाय शशांकने व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर आपले मतही मांडले आहे.

अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “नमस्कार. काल फिल्मसिटीच्या गेटसमोर मला कचरा दिसला त्याचा मी एक व्हिडीओ केला आणि इंटरनेटवर पोस्ट केला. हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला. आणि माझी तक्रार ही थेट बीएमसीपर्यंत पोहोचली आणि या तक्रारीचे निवारण केले. एका रात्रीत तिथून सगळा तो कचरा हटवला आणि त्याचा फोटो काढून त्यांनी बीएमसीच्या ऑफिशिअल पेजवरुन मला टॅग करत पोस्टही केला आहे. खूप बरं वाटतंय आपण केलेली तक्रार बीएमसीपर्यंत पोहोचली असून त्यांनी तक्रारीचे निवारण केले आहे. आपला आवाज बीएमसी ऐकत आहे. हे मुंबईत घडलं म्हणून मी फक्त बीएमसी असं बोलत आहे. पण जर महाराष्ट्रात वा देशात असं काही घडत असेल तर तुमचा आवाज उठवा ते नक्की मदत करतील”.
पुढे तो म्हणाला आहे की, “आणि या पोस्टखाली एक छान कमेंट होती की, आता आमच्या आवारातील कचरा उचलायचा असेल तर शशांक केतकरांना सांगावं लागेल तर ते बीएमसीला सांगतील. मी खरंच इतका मोठा नाही आहे. पण माझ्या सांगण्याने खरंच प्रश्न सुटणार असतील तर मी हे नक्की करेन. मीच नाही तर आवाज उठवणे ही प्रत्येकाची जबादारी आहे. बीएमसीपर्यंत, देशाच्या प्रमुख व्यक्तीपर्यंत हे सगळं पोहोचवा कारण हे प्रत्येकाच्या जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि राजकरणाच्या पलीकडे आहे”, असं म्हणत त्याने बीएमसीचे आभार मानले आहेत”.