मराठी मालिकाविश्व, रंगभूमी, सिनेसृष्टीत तसेच ओटीटीद्वारे आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेशने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही त्याची आणि प्रियाची जोडीही प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडते. ते दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
उमेशही त्याच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे त्याने त्याची दोन स्वप्नं पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. उमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमागे पुष्पा-२चे लोकप्रिय गाणे वाजताना दिसत आहे.
या व्हिडीओसह उमेशने असं म्हटलं आहे की, “दोन स्वप्न पूर्ण झाली. १८ मे ला २ नाटकांचे सलग ३ प्रयोग केले आणि याचा अनुभव खूपच कमाल होता. त्यानंतर १९ मे ला NCPA TATA Theatre ला ‘जर तरची गोष्ट’चा प्रयोग केला. हे नाटकही हाऊसफुल्ल झाले आणि या नाटकाचा प्रेक्षकवर्गही बहारदार होता” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – कर्क, कन्या व कुंभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी गुंतवणूक टाळावी, तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या…
उमेशने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या व्हिडीओखाली त्याला कमेंट्सद्वारे अभिनंदन असं म्हटलं आहे. सोनाली खरेने “वाह अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तर ऋजुता देशमुख, पल्लवी वैद्य यांनीही उमेशचे कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे.
दरम्यान, शांत स्वभाव, समजूतदारपणा व सहज सुंदर अभिनय करत उमेशने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. तसेच चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. उमेश नुकताच ‘मायलेक’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचबरोबर त्याचे सध्या रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे. या नाटकालाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.