प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनात मालिकांच महत्त्वाचं स्थान आहे. विशेषतः महिलावर्गात मालिकांची क्रेझ असलेली पाहायला मिळते. मालिकेच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी घराघरात पोहोचतात. या कलाकारांना मालिकेमुळेच खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळते. सध्या अनेक मालिका वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर अनेक नवनवीन चेहरे मालिकांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाहायला मिळत आहेत. इतक्या स्पर्धेतदेखील काही मालिका अजूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. (Amit Bhanushali bts Video)
अशीच टीआरपीच्या शर्यतीत कायमच अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेती सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. याशिवाय कल्पना, पूर्णा आजी, प्रताप, चैतन्य, साक्षी या पात्रांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सायली-अर्जुनची लुटुपुटूची भांडण पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे.
प्रत्येक दिवशी मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहचावा म्हणून मालिकेची संपूर्ण टीम मेहनत घेत असते. विशेषतः कलाकारांची पडद्यामगची मेहनत, धमाल हे सर्व जाणून घेण्यात प्रेक्षकांना उत्सुकता असते. कथेनुसार अनेकदा कलाकरांना उन्हात, पावसात आऊटडोर शूट करावं लागत.अनेकदा कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरुन शूटचे bts शेअर करत असतात. असाच एक bts व्हिडीओ अमित भानुशालीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.
“आउटडोर शूट, उष्णतेच्या झळा, मेहनतीचा घाम आहे”, असं कॅप्शन देत अमितने आउटडोर शूटदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनसह पूर्णा आजी व कल्पनादेखील दिसत आहे. प्रचंड उन्हात ‘ठरलं तर मग’ची टीम शूट करताना दिसत आहे. ही कलाकार मंडळी भर उन्हात शूट करत पडद्यावर याचा ताण अजिबात जाणवू देत नाहीत. “खरंच खूप गरमी आहे. काळजी घ्या”, “उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे”, अशा कमेंट करत त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.