प्रत्येक वाहिनीवर सुरु असणाऱ्या मालिकांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. मालिकांच्या कथानकाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. मालिकांमध्ये येणारी रंजक वळणे साऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच मालिकांच्या टीआरपीमध्ये नेहमीप्रमाणे यावेळीही ‘ठरलं तर मग’ ही मालिका अव्वल ठरली आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. (Marathi Serial TRP Chart)
तर काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. कला व अद्वैतची मालिकेतील चुरशीची भांडण पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. तर कला व अद्वैत एकत्र केव्हा येणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा अचानक टीआरपी घसरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या या मालिकेने आता चौथा क्रमांक गाठला आहे.
मालिकेत मुक्ता व सागर यांच्यातील प्रेमकथेत सावनीने मिठाचा खडा टाकल्याने प्रेक्षक नाराज असलेले दिसत आहेत. त्यामुळेच कदाचित मालिकेचा टीआरपी घसरला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सागर व मुक्ता कायमचे एकत्र यावेत अशी इच्छाही प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. तर स्टार प्रवाह वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हा या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मात्र आता या मालिकेचा टीआरपी घसरला असून ही मालिका पहिल्या पाच क्रमांकातही नसल्याचं दिसतंय.
तर गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायम टीआरपीमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असलेली पाहायला मिळाली. मात्र आता ही मालिका अचानक टीआरपीमध्ये १५व्या क्रमांकावर आली आहे. मालिकेच्या कथानकावरही प्रेक्षक नाराज असलेले पाहायला मिळत आहे. तर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत हळूहळू वर येताना दिसत आहे. मालिकेवर व मालिकेच्या कथानकावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत.