सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल तीन दशकांनंतर एका भारतीय चित्रपटाला कान्स महोत्सवात नामांकन मिळाले आहे. ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौरव झालेला पाहायला मिळाला. ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम. (Chhaya kadam return to india)
कान्स महोत्सवात झालेल्या कौतुकामुळे छाया कदम चर्चेत आलेल्या पाहायला मिळाल्या. ‘All We Imagine As Light’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. छाया कदम यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचा कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि या चित्रपटाचा प्रीमियर संपल्यानंतर उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी अभिनेत्रीचे कौतुक केले. यावेळी त्या भावुक होत आनंदाने थिरकतानाही दिसल्या.
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरव झाल्यानंतर आता छाया कदम मायदेशी परतल्या आहेत. मायदेशी परतल्यानंतर आता छाया कदम यांचं एअरपोर्टवरच कौतुक केलं गेलं. अनेकांनी एअरपोर्टवर येत त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इट्स मज्जासह साधलेल्या संवादात छाया कदम यांनी मायदेशी परतल्यानंतर त्यांना कसं वाटत आहे आणि त्या काय मिस करत होत्या याबद्दल बोलल्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “खूप मस्त वाटतंय. कधी कान्सपर्यंत पोहेचेन असा विचारही केला नव्हता. खूप भारी वाटतंय. मी कान्स मध्ये होते तेव्हा इथल्या जेवणाला खूप मिस केलं. आपल्या इथल्यासारखं जेवण तिथे मिळतं नाही. आज विमानात बसले तेव्हा भात पाहिला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी इथून जाताना वरण-भात खाल्लं होतं त्यानंतर आज परतीच्या प्रवासात विमानात खाल्लं. आणि उद्या तर मी माझ्या आवडीचं चिकन भाकरी सर्व खाणार आहे”.