‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असून ही मालिका साऱ्यांच्याच मनावर राज्य करताना दिसत आहे. ‘पारू’ या मालिकेत पारूची मुख्य भूमिका अभिनेत्री शरयू सोनावने साकारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर प्रसाद जवादे हा आदित्यच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. प्रसाद आणि पारूच्या जोडीला प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसतात. (Prasad Jawade On Amruta deshmukh)
नुकतीच ही जोडी आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. आदेश बांदेकर यांच्यासह पारू व आदित्य दोघांनीही अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात आजवर अनेक कलाकार मंडळी सहभागी झाले आहेत. अशातच पारूमधील पारू व आदित्य यांनी ‘होम मिनिस्टर’च्या या भागात सहभाग घेतला. यावेळी प्रसादसह आदेश बांदेकर यांनी एक खेळ घेतला. यांत आदेश यांनी प्रसादला त्याच्या बायकोच्या खटकणाऱ्या सवयीबद्दल विचारलं आहे.
नुकताच याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यांत आदेश बांदेकर प्रसादला, “अशी कुठलीही गोष्ट जी वर्षभरात खटकली आहे, खटकणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या आहेत”, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत प्रसाद म्हणाला, “तापटपणा कमी केला पाहिजे. दुसरं म्हणजे थोडं adventures व्हायला हवं. म्हणजे आळशीपणा कमी करुन ऍक्टिव्ह राहायला हवं”. यावर आदेश बांदेकर गंमतीत म्हणाले, “म्हणजे ती आळशी आहे”. तिसरं म्हणजे, तिने पूर्णपणे स्वयंपाक शिकावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. आणि चौथी म्हणजे तिने गाडी शिकली पाहिजे”.
या व्हिडीओवर अमृताने कमेंट करत एक स्टिकर शेअर केला आहे. यांत तिने “याचा बदला नक्की घेतला जाईल, असं म्हटलं आहे. अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांचा शाही विवाहसोहळा १८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली.