छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या शोचे फक्त महाराष्ट्र व भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक चाहते आहेत. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे हास्यजत्रेची टीम भारताबाहेरील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेकदा गेले असल्याचे पाहायला मिळाले. अशातच या टीमने नुकताच सिंगापूर दौराही केला.
हास्यजत्रेची संपूर्ण टीम यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे हास्यवीर कलाकार सिंगापूरमधील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी गेले होते. याबद्दलचा एक खास व्हिडीओ वनिता खरातने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. सोशल मीडियावर वनिता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अशातच तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सिंगापुर दौऱ्याचा खास व्हिडीओ शेअर करत वनिताने सिंगापुरच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. हा खास व्हिडीओ शेअर करत वनिताने असं म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला आता फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. सिंगापूरमधील प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद”. या व्हिडीओमध्ये वनितासह नम्रता संभेराव, चेतना भट, ओंकार राऊत, पृथ्विक प्रताप, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, श्याम राजापूत, प्रसाद खांडेकर, प्राजक्ता माळीदेखील दिसत आहेत.
आणखी वाचा – ‘मिथुन’सह ‘या’ राशींसाठी मंगळवारचा दिवस आर्थिक फायद्याचा, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…
दरम्यान, सिंगापूरमध्ये हास्यजत्रेच्या टीमला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. तुफान प्रेक्षकांच्या गर्दीत हास्यजत्रेचा सिंगापूर दौरा अगदी यशस्वी झाला ऐ त्याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला वनितासह हास्यजत्रेच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांचे कौतुकही केले आहे.