लोकप्रिय मराठी मालिकांमधून अभिनेत्री अश्विनी कासार घराघरांत पोहोचली. आजवर अश्विनीने तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अनेक ट्रेंडिंग रीलवरही अभिनेत्री व्हिडीओ करत ते पोस्ट करताना दिसते. सोशल मीडियावर अश्विनी बऱ्यापैकी सक्रिय असते, नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अश्विनीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिला प्रवासादरम्यान आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. (Ashwini Kasar Shared Experience)
या स्टोरीमध्ये अश्विनीने लोकल ट्रेन प्रवासादरम्यान आलेला एक वाईट अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ मुंबई पोलिसांनाही टॅग केलेला आहे. अश्विनीच्या स्टोरीमध्ये एक बाई तिच्या समोरच्या सीटवर बसलेली पाहायला मिळत आहे. मात्र तिला ट्रेनमध्ये गर्दी नसल्यामुळे अश्विनी जिथे बसली आहे तिथे तिला पाय सोडून बसायचे असतात मात्र अश्विनी समोरच्या सीटवर पाय सोडून बसण्यास तिला साफ नकार देते. एकूणच एका महिलेकडून मिळालेल्या वाईट वागणुकीनंतर अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

“या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय सोडून बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही त्रास होत होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, अशी संतापजनक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली.

यानंतर आता अभिनेत्रीने थेट रीतसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काल ट्रेनमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मी रीतसर पोलीस तक्रार केलेली आहे, त्यासाठी दादर पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांनी मला अतिशय उत्तम सहकार्य केले आहे. आता पुढील प्रक्रियेसाठी तक्रार कल्याण jurisdiction कडे पाठवण्यात येईल, खूप जणांनी मॅसेज, कॉल करुन चौकशी केली. त्याबद्दल धन्यवाद. रेल्वे पोलीसचे आभार. (काही जणांना ती व्यक्ती अमराठी आहे असं वाटत आहे. ती व्यक्ती मराठीच होती. इंग्लिशमध्ये भांडण करत होती. कृपया चुकीची माहिती पसरवू नये.)”, असं म्हणत तिने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे.