बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री आहेत. सध्या ‘पंचायत ३’च्या निमित्ताने चर्चेत आहेत. ‘पंचायत’ या वेबसिरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. येत्या २८ मे रोजी तिसरा भाग येणार असून सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. नीना या वेबसिरिजमध्ये गावच्या प्रधान मंजू देवी यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले आहे. या दरम्याने आता नीना यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील चर्चा अधिक रंगल्या आहेत. स्वतः नीना यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे. (neena gupta on career struggle )
नीना यांनी १९८२ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “सुरुवातीच्या तीन महिन्यातच स्वतःची बॅग घेऊन मुंबई सोडण्याचा विचार केला होता. मी दिल्लीची असल्याने मुंबईमध्ये जगणे थोडे कठीण वाटत होते. शिक्षित असल्याने दिल्लीला परत जाऊन पुढे शिक्षण घेत पीएचडी करण्याचा विचार करत होते. मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी हाताळणे कठीण झाले होते”.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “मी उद्या निघून जाईन असा विचार केला होता पण एखादे काम मिळेल अशी आशा होती. असे माझ्याबरोबर अनेकदा झाले. गरजेनुसार बदल होत गेले. सुरुवातीला पैशांची गरज असल्याने घाणेरड्या भूमिका कराव्या लागल्या. त्यामुळे हे चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ नयेत अशा प्रार्थना मी करत होते. पण सध्या मी अशा ठिकाणी आहे जिथे मी कोणालाही नाही असे म्हणू शकते”.
नीना यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर आता ‘पंचायत ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याचप्रमाणे नीना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असून आपले विचार रोकठोकपणे मांडत असतात.