सोशल मीडियावर सध्या पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेला कार अपघात चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोन तरुणांना धडक दिली. या दोन्ही तरुणांचा या धडकेत मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. यानंतर संपूर्ण जगभरातून याचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. (Chetan Vadnere Angry Post)
यानंतर त्या मुलाचा रॅप सॉंग गातानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो मुलगा एक रॅप साँग म्हणताना आणि शिव्या देताना दिसतो आहे. यावरुन सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर आता या मुलाच्या आईने सदर व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

हा व्हिडीओ पाहून सामान्य जनतेसह आता कलाकार मंडळींनीही आवाज उठवला आहे. ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेता चेतन वडनेरे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हायरल व्हिडीओ स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. आणि या व्हिडीओसह कॅप्शन देत त्याने असं म्हटलं आहे की, “माहित नाही का, पण मला नाही वाटत याला कठोर शिक्षा होईल. खरंतर झाली पाहिजे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेबाबत मला काही बोलायचं नाही, नाहीतर याला सोडून मला जेलमध्ये टाकतील”.
सोशल मीडियासह या प्रकरणावर संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आणि या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. सध्या हे प्रकरण चर्चेत आलेलं असून प्रत्येकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.