‘सिंघम’मधील जयकांत शिकरे असो किंवा ‘वॉन्टेड’मधील ‘गणी भाई’ या भूमिकांमुळे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले. प्रकाश यांनी १९९० साली अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. त्यांनी आतापर्यंत कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी या भाषांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाने आतापर्यंत सगळ्यांच्याच मनात जागा निर्माण केली. त्यांची करियरमधील कारकीर्द रंगात येत होती मात्र त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये वादळ निर्माण होत होतं. त्यांचे वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आलेले पाहायला मिळाले. (prakash raj life)
त्यांनी १९९४ साली त्यांनी अभिनेत्री ललिता कुमारीबरोबर लग्न केले. त्यांना मेघना, पूजा व सिद्धू अशी तीन मुलं होती. काही वर्षानंतर त्यांनी ललितापासून घटस्फोट घेतला आणि २०१० साली नृत्यदिग्दर्शिका पोनी वर्माबरोबर लग्न केले. ललिता व प्रकाश यांच्या नात्यावर जयंती कनप्पनने सविस्तर भाष्य केले आहे.
जयंती यांनी सांगितले की, “प्रकाश व ललिताची ओळख चेन्नईमध्ये झाली. त्यांनी प्रकाश यांना राहण्यासाठी घर शोधण्यामध्ये मदत केली होती. त्यामुळे त्यावेळी त्यांच्यामध्ये मैत्री वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. दोघांना दोन मुली व एक मुलगा झाला. पण त्यांच्या आयुष्यात असे काही झाले ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला.
प्रकाश यांचा मुलगा सिद्धू पतंग उडवताना छतावरुन पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा प्रकाश यांच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झाला. या घटणेमुळे प्रकाश त्यांच्या पत्नीपासून दूर होऊ लागले. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात पोनी आली आणि प्रकाश यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आले. त्यानंतर त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन पोनीबरोबर दुसरे लग्न केले.
प्रकाश यांनी त्यांच्या अभिनयाने अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यांची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे. ते एका चित्रपटासाठी २.५० कोटी रुपये फी घेतात. त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांचे मुंबई व चेन्नई येथे घरं असून फार्महाऊसदेखील आहे.