लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा नवरा विकी जैन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळाली. ‘बिग बॉस १७’च्या घरात ही जोडी धुमाकूळ घालताना दिसली. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकी यांच्यातील भांडण पाहून प्रेक्षकांनी त्यांना बरंच ट्रोल केलं. त्यानंतर ही जोडी वेगळी होते की काय अशा बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र दोघांनीही या अफवा असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला. (Ankita Lokhande Troll)
अंकिता लोखंडे अनेकदा तिचा पती विकी जैनवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला. ‘बिग बॉस’मध्ये अंकिता व विकी यांच्यातील भांडणही सर्वांनी पाहिली. पण ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर ही जोडी अनेकदा एकमेकांची काळजी घेताना दिसली आहे. नुकताच अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनच्या पायाला मसाज करताना दिसत आहे. अभिनेत्री नवऱ्याचे लाड करत असतानाचा हा व्हिडीओ आहे.
अंकिता विकीसाठी पेडीक्योर आणि पायाचा मसाज करत आहे. व्हिडीओमध्ये अंकिता “तुला माझा स्पा कसा वाटला”, असं विकीला विचारत आहे. यावर उत्तर देताना विकी म्हणतो, “खूप चांगला आहे”. हा व्हिडीओ शेअर करत विकीने कॅप्शन देत लिहिलं आहे की, “एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे नवरा-बायको या गोष्टी करतात”. या जोडप्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकीकडे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दुसरीकडे, अंकिता आपल्या पतीच्या पायाची मालिश करताना पाहून काही लोकांनी तिला ट्रोल केले. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “तुमचं असं प्रेम ‘बिग बॉस’मध्येही पाहायला मिळालं असतं”, तर दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, “हे सर्व सोशल मीडियावर दाखवण्याची गरज नाही”.
अंकिता लोखंडेच्या हाताला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विकी बायकोचा मेकअप करताना दिसला. अंकिता तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर तिच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल अपडेट देत असते. नुकतीच हाताला दुखापत कशी झाली याबाबतही अंकिताने सांगितले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अंकिता लोखंडे व विकी जैन आता ‘लाफ्टर शेफ्स’ या आगामी शोमध्ये दिसणार आहेत. या कॉमेडी शोमध्ये स्वयंपाकाबरोबर मनोरंजनही होणार आहे.