‘झी मराठी’ वाहिनीवर एकामागोमाग एक रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहिनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. अशातच एकामागे एक येणाऱ्या या नव्या मालिकांनी प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत केली आहे. या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. ‘पारू’, ‘शिवा’ या मालिकांनंतर आता आणखी एका मालिकेची ‘झी मराठी’ वाहिनीवर भर पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेत नेमकं काय असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Nitish Chavan New Serial)
मालिकेच्या नव्या प्रोमोने याची उत्सुकता वाढवून ठेवलेली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ असे नाव असलेली ही मालिका आहे. प्रोमोची सुरुवातच खंडोबाच्या देवळात होते, मोठमोठ्याने वाजणाऱ्या तुताऱ्या आणि सगळीकडे उडणारा भंडारा वातावरण मोहून टाकत आहे. यात बलदंड बहू आणि करारी नजर असणारा आमचा दादा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ही भूमिका अभिनेता नितीश चव्हाण साकारणार आहे.
या मालिकेत एका लोकप्रिय चेहऱ्याची एन्ट्री होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’वरील ‘लागीर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून नितीशने एन्ट्री केली होती. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं आणि टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल ठरली. तर या मालिकेनंतर आता नितीशने पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर कमबॅक केलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
चार बहिणींना माया देणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या या लाडक्या दादाची कथा छोट्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. नीतीश आणि झी मराठी यांचं गेल्या अनेक वर्षांपासूनच नातं आहे. आता हे नातं नितीशने नव्या मालिकेतून एन्ट्री घेत जोपासलेलं पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झी मराठी ही मालिका घेऊन येत आहे. आता ही मालिका नेमकी केव्हा येणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. या मालिकेत आता आणखी कोणते कलाकार झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.